सिंधुदुर्ग हा महत्त्वाचा पर्यटन जिल्हा असून, चिपी विमानतळावरून मुंबईसाठी हवाई सेवा लवकर सुरू करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याचे निर्देश मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी दिले आहेत.
चिपी–मुंबई विमानसेवा सुरू करण्याबाबत मंत्री राणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडामिस (व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे), चिपी विमानतळाचे संचालक कुलदीप सिंह, महाराष्ट्र एअरपोर्ट कंपनीच्या प्रांजली खवले, तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत मंत्री राणे यांनी सांगितले की, चिपी–मुंबई हवाई सेवेसाठी राज्य सरकारने व्हायबिलिटी गॅप फंडिंग (VGF) मंजूर केले आहे. त्यामुळे संबंधित कंपनीने लवकरात लवकर सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी. तसेच मुंबईसाठी सकाळ आणि सायंकाळ अशा दोन वेळा फ्लाइट सुरू करण्याचाही विचार करण्याचे निर्देश देण्यात आले.
सध्या या हवाई सेवेसाठी आवश्यक सुरक्षा मंजुरी आणि इतर परवानग्या मिळवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली.