आटगाव स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला; वाहतूक ठप्प

मध्य रेल्वेच्या आटगाव रेल्वे स्टेशनजवळ शनिवारी सकाळी लोकलचा डबा रेल्वे रुळावरून घसरल्याची घटना घडली आहे. त्यामुळं आसनगाव ते कसारा दरम्यानची लोकल वाहतूक ठप्प झाली असून, मुंबईकडे येणाऱ्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. या लोकलच्या डब्यात ८ ते ९ प्रवासी होते. या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याचा मध्य रेल्वेने दावा केला आहे.

शनिवारी सकाळी ७ वाजून २८ मिनिटाच्या सुमारास मध्य रेल्वेच्या आटगाव स्टेशन जवळ लोकलचा डबा रुळावरून घसरला. ही लोकल आटगावकडे येत होती. लोकलचा डबा रेल्वे रुळावर आल्याने आसनगाव ते कसारा वाहतूक ठप्प झाली आहे. या अपघाताची माहिती मिळताच मध्य रेल्वेच्या कर्मचारी-अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन लोकलचा डबा रेल्वे रुळावरून दूर करण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत.

कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून सर्वसामान्यांना लोकलमधून प्रवासास बंदी करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेतील कामगारांनाच रेल्वेतून प्रवासास मुभा देण्यात आली आहे. अत्यंत कमी प्रमाणात लोकांना प्रवासाची मुभा देण्यात आल्याने लोकलच्या फेऱ्याही मर्यादित प्रमाणात चालवण्यात येत आहेत. त्यामुळे लोकल, बस आणि एसटीमध्ये नागरिकांची तुफान गर्दी असते. 

कसारा ते आसनगाव दरम्यानची वाहतूक बंद पडल्याने मुंबईला कामासाठी येणाऱ्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या