परराज्यातील मालवाहतूक वाहन चालकांना कोरोना चाचणी बंधनकारक

परराज्यातून येणाऱ्या मालवाहतूक वाहनांच्या चालक आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची (corona) आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. ८ ते १० दिवस विविध राज्यांच्या सीमा ओलांडणाऱ्या मालवाहतूक वाहन चालकांना महाराष्ट्रात (maharashtra) येण्यापूर्वी चाचणी करून त्याचा अहवाल येईपर्यंत थांबावं लागणार आहे. राज्य सरकारनं कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला नियंत्रणात आणण्यासाठी घातलेले निर्बंध ३१ मेपर्यंत वाढवले आहेत. तसेच नवीन निर्बंधही लागू केले असून परराज्यातून येणाऱ्या मालवाहतूक वाहनांच्या चालक व सहाय्यकांनी कोरोना चाचणी अहवाल देणं बंधनकारक करण्यात आले आहे.

कोरोना चाचणीचा अहवाल ४८ तासांपूर्वीचा नसावा, अशी अटही घालण्यात आली आहे. त्यामुळं वाहतूकदारांना मालाची गाडी भरल्यानंतर महाराष्ट्राच्या सीमेजवळील गावांमध्ये आरटीपीसीआर चाचणी केंद्र शोधत फिरावं लागणार आहे. अनेक राज्यांत आरटीपीसीआर चाचणी अहवाल मिळण्यास २ ते ३ दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळं मालवाहतूकदारांना चाचणी अहवाल येईपर्यंत २ दिवस मालाची गाडी रस्त्याकडेला उभी करण्याशिवाय गत्यंतर राहाणार नाही.

परिणामी, औषधे, आरोग्य क्षेत्रातील उत्पादनं, अन्नधान्य, कारखान्यांसाठीचा कच्चा माल, आयात-निर्यात मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांचा प्रवास रखडण्याची शक्यता आहे. त्यातून हा माल इच्छित स्थळी पोहोण्यासाठी २ ते ३ दिवसांचा विलंब होऊ शकण्याची शक्यता आहे. अनेक वाहनं प्राणवायूचे सिलिंडर वाहून नेतात, प्राणवायूचे टँकर्स राज्यांच्या सीमा ओलांडतात. या वाहनांनाही विलंब झाल्यास अडचणी उद्धभवण्याची शक्यता आहे. शिवाय, ऑनलाइन खरेदी केलेल्या वस्तूही ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास विलंब होण्याची शक्यता आहे.

राज्यात गुरुवारी ४२ हजार ५८२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ८५० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय ५४ हजार ५३५ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. राज्यातील एकूण रुग्णांचा आकडा  ५१ लाख ६९ हजार २९२ झाला आहे. यापैकी ४६ लाख ५२ हजार ७३१ रुग्ण बरे झाले आहेत. तर ७८ हजार ८५७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  सध्या महाराष्ट्रात ५ लाख ३३ हजार २९४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


हेही वाचा -

Cyclone Tauktae : मुंबईसह 'या' भागात जोरदार पावसाची शक्यता, पालिका लागली कामाला

महाराष्ट्रात म्युकरमायकोसीसच्या रुग्णांमध्ये वाढ, आरोग्यमंत्र्यांनी केली केंद्राकडे इंजेक्शनची वाढीव मागणी


पुढील बातमी
इतर बातम्या