बेस्टच्या २०० कर्मचाऱ्यांची कोरोनावर मात

मुंबईतील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस प्रचंड वाढ होत आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना बेस्ट उपक्रमामार्फत वाहतूक सेवा पुरवली जात आहे. परंतु, आता या कर्मचाऱ्यांनाच कोरोनानं टार्गेट केलं आहे. बेस्टच्या एकूण ३५० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. असं असलं तरी कोरोनावर यशस्वी मात करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्याही जास्तच आहे.

बेस्ट उपक्रमामध्ये कार्यरत असणाऱ्या आणि कोरोनावर यशस्वीरित्या मात करणाऱ्या कर्मचाऱ्यांची एकूण संख्या २०० झाली आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेले कर्मचारी कर्तव्य भावनेने वैद्यकीय कर्मचारी, पोलीस, बॅंक कर्मचारी यांना परिवहन सेवा अव्याहतपणे पुरवित असल्याची माहिती बेस्ट उपक्रमानं दिली. तसंच, मुंबईतील वीज पुरवठा विनाखंडित ठेवण्यासाठी देखील झटत आहेत.

बेस्टच्या काही कर्मचाऱ्यांच्या कोरोनाशी दोन हात करताना मृत्यू झाला आहे. त्यापैकी ४ कामगारांच्या वारसांना बेस्ट उपक्रमात नियुक्तीचा निर्णय जाहीर केला आहे. राज्यात गुरूवारी कोरोनाचे नवीन २९३३ रुग्ण आढळले आहेत. सध्या राज्यात ४१ हजार ३९३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर गुरूवारी १३५२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३३ हजार ६८१ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. 

सध्या राज्यात ४६ शासकीय आणि ३७ खाजगी अशा एकूण ८३ प्रयोगशाळा कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५ लाख १० हजार १७६ नमुन्यांपैकी ७७ हजार ७९३ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख ६० हजार ३०३ लोक होम क्वारंटाईनमध्ये  आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७३ हजार ०४९ खाटा उपलब्ध असून सध्या ३० हजार ६२३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.


हेही वाचा -

'असे' आहेत कल्याण - डोंबिवलीमध्ये कंटेनमेंट झोन

'ही' आहे वसई, विराई, नालासोपारातील कंटेनमेंट झोनची यादी


पुढील बातमी
इतर बातम्या