लवकरच परप्रांतीयासाठी मुंबईतून सुटू शकते विशेष ट्रेन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन सुरु आहे. लॉकडाऊन जाहिर झाल्यापासून देशभरातले मजूर, कामगार वेगवेगळ्या राज्यात अडकले गेले. त्यानंतर तिसऱ्या लॉकडाऊनच्या काळात या मजूरांना कामगारांना आपआपल्या राज्यात परत पाठवण्याची तयारी गेली आणि त्यानुसार त्यांच्यासाठी विशेष ट्रेन सोडण्यात आल्या. महाराष्ट्रातून पहिली ट्रेनही भिवंडी आणि नाशिकहून सोडण्यात आली. त्यानंतर आता मजुरांना त्यांच्या राज्यात पोहोचविण्यासाठी लवकरच मुंबईतूनही रेल्वेगाड्या सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. विश्वसनीय सूत्रांनी याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे आता मुंबईतूनही विशेष ट्रेन सोडली जाऊ शकते. मुंबईत अडकलेले मजूर आणि कामगार हे प्रामुख्यानं उत्तर प्रदेश आणि बिहारचे आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रातून आणि मुंबईतल्या जवळच्या रेल्वे स्थानकावरुन आधीच रेल्वेगाड्या रवाना झाल्या आहेत. मात्र अद्याप प्रत्यक्षात मुंबईतल्या कुठल्याही रेल्वे स्थानकावरुन मजुरांना नेणारी गाडी सोडण्यात आलेली नाही.

या मजुरांबाबत उत्तर प्रदेश सरकारशी राज्य सरकारनं चर्चा देखील केली. त्यावेळी काही अटी असल्यामुळे काही समस्या निर्माण झाल्या होत्या. मात्र आता ते प्रश्न मिटले असून मुंबईतून रेल्वेगाड्यांनी परप्रांतीयांना नेण्यात येईल, असं सांगण्यात येत आहे. याबाबत राज्य सरकारनं रेल्वे प्रशासनासी चर्चा केली असून अधिकच्या रेल्वे गाड्यांची मागणी केली आहे. दरम्यान राज्याला जेवढ्या रेल्वेगाड्यांची गरज आहे त्याच्या तुलनेत खूप कमी गाड्या दिल्या जात आहे. त्याबद्दल बैठकीत नाराजी देखील व्यक्त केली गेली.

पुढील बातमी
इतर बातम्या