लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची ने-आण एसटी महामंडळातर्फे करण्यात येत आहे. अत्यावश्यक सेवा देत असताना कुर्ला नेहरूनगर येथील कार्यशाळेतील यांत्रिक कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली. या कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्या इतर ६ जणांची तपासणी करण्याऐवजी त्यांना घरी जाण्यास सांगून दुसऱ्या दिवशी या कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन केलं. त्यामुळं एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दुर्लक्ष करत असल्याचं एसटी कर्मचारी संघटनेचे म्हणणं आहे.
एसटी महामंडळातील कुर्ला नेहरूनगरमधील यांत्रिक कर्मचाऱ्याला १ मे रोजी कोरोनाची लागण झाली. यावेळी हा कर्मचारी घाटकोपर येथील रुग्णालयात दाखल झाला. मात्र या कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्या ६ जणांची तपासणी करण्याऐवजी त्यांना घरी पाठविण्यात आलं. त्यामुळं या ६ जणांच्या संपर्कात येणाऱ्या नागरिकांना कोरोना होण्याची भीती आहे. त्यामुळं एसटी कर्मचारी संघंटनांनी आक्षेप घेत, या ६ जणांना खासगी रुग्णालयात दाखल केले.
यामुळं संबंधित आगार व्यवस्थापक आणि एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या आरोग्याशी खेळत असल्याचं एसटी कर्मचारी संघटनेचं म्हणणं आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या विभागांतून अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एसटी बस धावत आहेत. मात्र या कर्मचाऱ्यांना योग्य मास्क, हातमोजे, सॅनिटायझर दिले गेले नाही. रेस्ट रूम स्वच्छ केली जात नाही. बस आणि आगार परिसर निर्जंतुकीकरण केले जात नाही, असंही एसटी कर्मचारी संघटनेनं म्हटलं.
या घटनेमुळं एसटी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. कोरोना लागण झालेल्या कर्मचाऱ्यांसह इतर ६ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांची आरोग्य तपासणी केली पाहिजे. एसटी महामंडळ आणि संबंधित अधिकारी वर्ग कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळत आहे.