'व्हिस्टाडोम कोच'चे दर जास्त, प्रवासी नाराज

कोकणातील निसर्गाचा प्रवाशांना आस्वाद घेता यावा यासाठी मध्य रेल्वेने या मार्गावर धावणाऱ्या गाड्यांमध्ये पारदर्शक डबा म्हणजेच 'व्हिस्टाडोम कोच' लावण्याचे ठरवले आहे. रविवारी वाजतगाजत उद्घाटन झालेल्या या पारदर्शक डब्यातील पहिल्या फेरीला किती प्रतिसाद मिळतो याबाबत कुतुहूलही निर्माण झाले होते. प्रवाशांनी या डब्याच्या डिझाईनला पसंती दिली, असली तरी या डब्यातील आसनांच्या तिकीटांचे दर जास्त असल्याने नाराजीही व्यक्त केली. 

पहिल्याच दिवशी अल्पप्रतिसाद

त्यामुळेच या पारदर्शक डब्यात पहिल्या दिवशी केवळ ५० टक्के आसनांसाठी नोंदणी झाली. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या आरामदायी प्रवासाचा विचार केलेला असला, तरी त्याचे तिकीट दर जास्त असल्यामुळे प्रवाशांचा या डब्याला अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.

दादर-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसला जोडलेल्या या विशेष डब्यात ४० अासने असून पहिल्या दिवशी फक्त २० जागा आसनांसाठी नोंदणी झाली. मात्र साप्ताहिक आणि मोठ्या सुट्ट्यांमध्ये तिकीट नोंदणीला मोठा प्रतिसाद मिळेल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

कोकणवासी आणि परदेशी पाहुण्यांसाठी रेल्वेचा प्रवास अजून सुखकर व्हावा, तसेच पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी भारतीय रेल्वेने दादर - मडगाव ट्रेनला हा 'व्हिस्टाडोम' कोच जोडण्याचा निर्णय घेतला आहे.

‘व्हिस्टाडोम’ कोचमधून पाहा निसर्गरम्य कोकण

या डब्याला काचेचे छत तसेच काचेच्या मोठ्या खिडक्या आहेत. त्यामुळे ‘व्हिस्टाडोम’ कोचमध्ये बसलेल्या प्रवाशांना सहजतेने धावत्या गाडीतून निसर्गरम्य कोकण बघता येणार आहे.

इतर डब्यांसाठी लागलेल्या खर्चाइतका खर्च या पारदर्शक डब्यास आल्याचे सांगण्यात येत आहे. अशावेळी पर्यटक-प्रवाशांची संख्या वाढवायची, असेल तर त्यासाठी जास्त दर आकारणे योग्य नव्हते, असे मत प्रवाशंनकडून व्यक्त होत आहे.

'ही सेवा लोकप्रिय ठरेल'

दादर ते मडगावसाठी या डब्यातील तिकीट २,३३५ रुपये असल्याने तिकीट विक्री किती होईल, याचा अंदाज येत नव्हता. मात्र, सोमवारी पहाटे ही गाडी सुटली, तेव्हा या डब्यात २० प्रवासी असल्याचे दिसले. त्यामुळे मध्य रेल्वेला पहिल्या दिवशी पारदर्शक डब्यातून ४६ हजार ७०० रुपयांचा महसूल मिळाला आहे. 

पहिल्या दिवशी किमान ५० टक्के जागा भरल्याने रेल्वेला ही सेवा लोकप्रिय ठरेल, असा विश्वास आहे.


हेही वाचा - 

महालक्ष्मीच्या दर्शनासाठी बेस्टच्या जादा बस


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

पुढील बातमी
इतर बातम्या