रेल्वे मंत्र्यांनी राज्यातील प्रलंबित रेल्वे थांब्यांना मंजुरी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील सुमारे 52 रेल्वेगाड्यांना 23 स्थानकांवर थांबे मंजूर करण्यात आले आहेत. यामुळे प्रवासी आणि चाकरमान्यांच्या सोयींमध्ये लक्षणीय वाढ होणार आहे.
विशेष म्हणजे, कोकणवासीयांसाठी महत्त्वाच्या दादर–सावंतवाडी एक्स्प्रेस आणि दिवा–सावंतवाडी पॅसेंजर अनुक्रमे रोहा आणि पेण स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.
थांब्यांसाठीची मागणी कायमच सुरू
गेल्या काही वर्षांपासून स्थानिक नागरिक, प्रवासी संघटना तसेच सामाजिक कार्यकर्ते आपल्या परिसरातील रेल्वे स्थानकांवर गाड्यांचे थांबे मिळावेत यासाठी सतत प्रयत्नशील होते. या संदर्भात मध्य रेल्वे प्रशासन, रेल्वे मंडळ आणि रेल्वे मंत्र्यांना वेळोवेळी निवेदनं देण्यात आली होती.
मात्र थांबे मंजुरीचा अंतिम अधिकार रेल्वे मंडळाकडे असल्याने हा मुद्दा अनेकदा प्रलंबित राहिला. अखेर स्थानिक लोकप्रतिनिधी आणि खासदारांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर हा निर्णय मंजूर झाला.
यानुसार, गाडी क्रमांक 11003/11004 ‘दादर–सावंतवाडी–दादर तुतारी एक्स्प्रेस’ला रोहा येथे थांबा मिळणार आहे. तसेच गाडी क्रमांक 10105/10106 ‘दिवा–सावंतवाडी–दिवा पॅसेंजर’ला पेण येथे थांबा देण्यात आला आहे. ही सुविधा लागू झाल्यानंतर कोकणात प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयींमध्ये मोठी भर पडेल.
राज्यातील थांब्यांचे तपशील
रेल्वे मंत्रालयाच्या ताज्या यादीत 23 स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. त्यापैकी इगतपुरी येथे सर्वाधिक म्हणजे 8 गाड्यांना थांबा मिळाला आहे. देवळाली येथे 4 गाड्यांचे थांबे मिळाले आहेत.
जळगाव जिल्ह्यातील भादली, सोलापूरमधील मोहोळ, भिवंडी रोड, पुण्यातील वलीवडे, अहिल्यानगर जिल्ह्यातील विळद, सोलापूरमधील सारोळा, अहिल्यानगरमधील राहुरी, रांजणगाव रोड, पढेगाव रोड, काष्टी, चितळी, बेलवंडी, अकोलनेर, वांबोरी, जंबाडा, हिरदागड आणि मरतूर या प्रत्येकी 2 गाड्यांचे थांबे मंजूर झाले आहेत.
कोकणातील प्रवाशांसाठी विशेष सोय
कोकणमार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी रोहा आणि पेण येथील थांबे हा मोठा दिलासा ठरणार आहे. विशेषतः दादर, दिवा, ठाणे, पनवेल आणि त्यानंतरच्या कोकण मार्गावरील प्रवाशांना याचा थेट लाभ होईल.
अनेक वर्षांपासून प्रवासी संघटना या दोन्ही स्थानकांवर थांबे मिळावेत यासाठी प्रयत्न करत होत्या. रोहा हा कोकण रेल्वे मार्गावरील महत्त्वाचा जंक्शन असल्याने येथे थांबा मिळाल्याने प्रवास अधिक सोयीचा होईल.
हेही वाचा