मुंबईत अधिक लांब पल्ल्याच्या गाड्या चालवण्याचा मार्ग मोकळा करणारे दोन जुन्या प्रलंबित प्रकल्प अखेर गती पकडत आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) विस्तार आणि परळ येथे नवीन रेल्वे टर्मिनस उभारण्यात येत आहे.
सेंट्रल रेल्वे (CR) मधील सूत्रांनी सांगितले की, रेल्वे मंत्रालयाच्या प्रोजेक्ट इव्हॅल्यूएशन कमिटीने (PEC) दोन्ही प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. आता रेल्वे बोर्डाची अंतिम मान्यता मिळाल्यानंतर निविदा प्रक्रिया सुरू होईल.
सिनियर CR अधिकाऱ्यांनी सांगितले की, PECने काही दिवसांपूर्वीच दोन्ही प्रकल्पांना हिरवा कंदील दिला असून ब्लूप्रिंट्स तयार आहेत.
“सर्व परवानग्या मिळाल्यानंतर या आर्थिक वर्षातच काम सुरू होईल,” असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
LTT विस्तार: 3–4 नवे प्लॅटफॉर्म
LTT आणि विद्याविहार स्टेशनदरम्यान पुरेशी जागा उपलब्ध असल्याने किमान 3 ते 4 नवे प्लॅटफॉर्म उभारण्याची योजना आहे.
सध्या LTTवरून 26 जोड्या दीर्घ पल्ल्याच्या गाड्या सोडल्या जातात, तर सुट्टीच्या काळात हा आकडा 37 जोड्यांपर्यंत जातो. नवीन प्लॅटफॉर्म तयार झाल्यास 6 ते 10 अतिरिक्त जोड्या गाड्या चालवणे शक्य होईल, ज्यामुळे वाढत्या मागणीचा ताण कमी होईल.
ज्या जागेवर प्लॅटफॉर्म वाढवण्याचा प्रस्ताव आहे, तिथे सध्या रेल्वे क्वार्टर्स, रेल्वे मालमत्ता आणि जुने रेल्वे ट्रॅक आहेत. विस्तारानंतर या भागातून सांताक्रूझ–चेंबूर लिंक रोडला (SCLR) प्रवेश देण्याचीही शक्यता आहे.
LTT हा मुंबईतील सर्वाधिक गर्दीचा टर्मिनस असून दररोज सरासरी 70,000 प्रवासी येथे प्रवास करतात.
रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मंत्रालयाची इच्छा आहे की मुंबईतून आणखी 50 लांब पल्ल्याच्या गाड्या चालवल्या जाव्यात.
परळ टर्मिनसला मंजुरी; दादर-CSMT वरील गर्दी कमी होणार
परळमधील प्रस्तावित टर्मिनसालाही PEC मान्यता मिळाली आहे. हा टर्मिनस कुर्ला–परळ दरम्यानच्या नव्या पाचव्या आणि सहाव्या मार्गाशी जोडला जाणार आहे आणि येथे फक्त मेल व एक्सप्रेस गाड्यांचा वापर असेल.
मुंबई रेल प्रवासी संघाचे अध्यक्ष मधू कोटीयन म्हणाले “परळ हा शहरासाठी एक महत्त्वाचा अतिरिक्त हब ठरणार असून दादर आणि CSMTवरील ताण कमी करेल.”
परळ टर्मिनसची अंदाजित किंमत 500 कोटी असून येथे दोन आयलंड प्लॅटफॉर्म आणि चार प्लॅटफॉर्म लाईन्स असतील, ज्यावर 26 डब्यांच्या गाड्या थांबू शकतील.
पूर्वेकडील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडकडून 15 मीटर रुंद प्रवेश रस्ता (2x2 लेन), रॅम्प आणि वायाडक्टसह प्लॅटफॉर्मशी जोडण्याची योजना आहे.
2016 मधील अडथळे दूर
हा प्रस्ताव 2016 पासून प्रलंबित होता कारण CR ट्रेड युनियनकडून परळ वर्कशॉप बंद करण्यास विरोध होता. आता वर्कशॉपमधील कर्मचाऱ्यांना शहरातील इतर वर्कशॉपमध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय झाला आहे.
हेही वाचा