कोलमडलेली हार्बर रेल्वे वाहतूक हळूहळू पूर्वपदावर

हार्बर मार्गावरील बेलापूर स्टेशनजवळ मंगळवारी सकाळी १०.३० वाजेदरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्यानं हार्बर मार्गावरची सेवा विस्कळीत झाली होती. यामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्याने याचा सर्वात जास्त त्रास मुंबईहून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना बसला. सध्या हार्बर रेल्वेची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत असून संध्याकाळच्या सर्व गाड्या या वेळापत्रकानुसार चालतील असं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

हार्बर मार्गावर गेले ४ दिवस मेगाब्लॉक घेऊनही त्याचा फायदा प्रवाशांना झालेला नाही. सकाळी हार्बर डाऊन मार्गावरची ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे हार्बर रेल्वेवरील प्रवाशांना ट्रान्सहार्बर मार्गावरुन (ठाणेमार्गे वाशी-पनवेल) प्रवास करण्याची मुभा देण्यात आली होती. शिवाय, आता बिघाड दुरुस्त झाला असून वाहतूक पूर्ववत झाली आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी प्रविण पाटील यांनी दिली आहे.

बेलापूर स्थानकात एका लोकलचा पेंटाग्राफ तुटला होता, त्यामुळे पनवेलला जाणारी वाहतूक बंद होती. जवळपास १ वाजेच्या सुमारास तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आला. त्यानुसार, हळूहळू वाहतूक पूर्वपदावर येत आहे. तसंच बेलापूर ते पनवेल अशी डाऊन दिशेची वाहतूक विस्कळीत झाली. पण, आता वाहतूक व्यवस्थित सुरू असल्याची माहितीही जनसंपर्क अधिकारी प्रवीण पाटील यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली.

पुढील बातमी
इतर बातम्या