महाराष्ट्र बंदचा 'बेस्ट'ला आर्थिक फटका; चाकरमान्यांचेही हाल

उत्तर प्रदेशातील लखीनपुर खेरी इथं शेतकऱ्यांच्या विरोधात झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ सोमवारी महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला होता. सत्ताधारी पक्षांनी हा बंद पुकारला होता. मात्र, या बंदमुळं चाकरमान्यांचे मोठे हाल झाले असून, मुंबईची दुसरी लाइफलाइन 'बेस्ट' उपक्रमाचेही आर्थिक नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. सोमवारी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदमुळे बेस्ट उपक्रमाचे दीड कोटी रुपयांहून अधिक प्रवासी उत्पन्न बुडाल्याचं समजतं. बसगाड्या न धावल्याने केवळ २८ लाख रुपयांचे प्रवासी उत्पन्न उपक्रमाच्या तिजोरीत पडल्याची माहिती समोर येत आहे.

महाराष्ट्र बंदमध्ये बेस्ट उपक्रमाच्या ११ बसगाड्यांची तोडफोड करण्यात आल्याची माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली. या नुकसानाची माहिती उपक्रमाकडून घेतली जात आहे. धारावी, मानखुर्द, शिवाजी नगर, चारकोप यासह अन्य काही भागात या गाड्यांची तोडफोड करण्यात आली. बेस्ट कामगार सेनेने कामगारांना कामावर न येण्याचे आदेशच दिले होते. तर तोडफोड करण्यात आल्यानं बेस्ट उपक्रमानं बस सेवा न चालवण्याचाच निर्णय घेतला.

दुपारी ३.३० वाजेच्यानंतर बेस्टची सेवा हळूहळू सुरू झाली. ३,३३३ बेस्ट बसपैकी १,८४९ बस धावल्या. त्यामुळे २८ लाख ७३ हजार ४६३ रुपये प्रवासी उत्पन्न मिळाले. ७ ऑक्टोबरला २५ लाख ९३ हजार प्रवाशांनी प्रवास केल्याने एक कोटी ९८ लाख ६७ हजार रुपये उत्पन्न मिळाले होते. तर ८ ऑक्टोबरला २६ लाख ७३ हजार प्रवाशांनी प्रवास केल्यानं २ कोटी ३ लाख ६६ हजार रुपये उत्पन्नाची भर पडली होती. परंतु सोमवारी झालेल्या बंदमध्ये उत्पन्नात घसरण झाली. अंदाजे दीड कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न बुडाल्याचं समजतं.

पुढील बातमी
इतर बातम्या