एसी लोकलच्या सर्व फेऱ्या रद्द

  • मुंबई लाइव्ह टीम & वैभव पाटील
  • परिवहन

मोठा गाजावाजा करत सुरू केलेल्या पश्चिम रेल्वे मार्गावरील एसी लोकलचा अल्पावधीतच पुरता फज्जा उडाला आहे. एसी लोकलसाठी भरमसाठ दराने तिकीट खरेदी केल्यानंतरही कुलिंग होत नसल्याने प्रवाशांना गारेगार प्रवासाऐवजी उकड्यातून प्रवास करावा लागत आहे. यामुळे संतापलेल्या प्रवाशांनी शुक्रवारी मात्र कंटाळून एसी लोकल अडवली.

प्रवासी संतप्त

अंधेरी रेल्वे स्थानकावर सकाळी साडेआठच्या सुमारास प्रवाशांनी एसी लोकल रोखत संताप व्यक्त केल्याने मोठा गोंधळ झाला. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

 

जवळपास 20 मिनिटे एसी लोकल रोखत प्रवाशांनी एसी लोकलमधील सुविधांचा कसा बोऱ्या वाजला आहे हेच दाखवून दिलं. यानंतर चक्क पश्चिम रेल्वेवर एसी लोकलच्या सर्व फेऱ्या रद्द करण्याची नामुष्की ओढवली आहे.

पुढील सूचना येईपर्यंत सेवा बंद

पुढील सूचना येईपर्यंत ही सेवा बंद राहणार असून आता सर्व एसी लोकल चाचणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेने ट्विटरद्वारे दिली आहे. तर प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून पश्चिम रेल्वेने विशेष लोकलही सोडल्या आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या