प्रवाशांना दिलासा! 'परे'वरील सरकते जिने लवकरच होणार सुरू

रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांची प्रवासादरम्यान व स्थानकात गैरसोय होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनानं अनेक सोयीसुविधा सुरू केल्या आहेत. त्यानुसार, रेल्वे स्थानकात सरकते जिने, उद्ध्वाहन यांसारख्या अनेक सुविधा रेल्वे स्थानकात सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, रेल्वे प्रशासनानं मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकातील सरकते जिने बंद ठेवल्यानं प्रवाशांची होणारी गैरसोय थांबविण्यासाठी अखेर ज्या स्थानकात मेल-एक्स्प्रेस गाड्यांना थांबा आहे, त्या स्थानकातील सरकते जिने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जिने बंद असल्याने रेल्वेला प्रवाशांच्या नाराजीला तोंड द्यावे लागत होते. सध्या अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांबरोबरच महिला प्रवासीही लोकल प्रवास करत असून दररोजची प्रवासी संख्या १५ लाखांवर गेली आहे. परंतु, मध्य रेल्वेवर असलेले ७६, तर पश्चिम रेल्वेवरील ५२ सरकते जिने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळं प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागतं.

अपंग प्रवासी, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिलांची पादचारी पूल चढताना दमछाक होते. त्यातच मेल-एक्स्प्रेस प्रवाशांनाही सामानासह स्थानकातून बाहेर पडण्यासाठी पादचारी पूलच चढावे लागत असल्याने मोठी कसरत करावी लागते. मार्च महिन्यापासून बंद ठेवलेले सरकते जिने सुरू करण्याचा विचारही रेल्वे प्रशासनाकडून होत नव्हता.

आता पश्चिम रेल्वेनं मात्र मेल-एक्स्प्रेस गाड्या ज्या स्थानकात थांबतात, त्या स्थानकातील सरकते जिने लवकरच सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या पश्चिम रेल्वेवरून एकूण ८० विशेष गाड्या अप-डाउन करतात. वांद्रे टर्मिनस, मुंबई सेन्ट्रल येथून सुटणाऱ्या गाड्यांना दादर, बोरिवलीसह पुढे काही स्थानकांत थांबा असतो. त्यामुळं या स्थानकातील सरकते जिने प्रथम सुरू करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या