पश्चिम रेल्वेच्या दादर रेल्वे स्थानकात होणार 'फॅमिली मॉल'

पश्चिम रेल्वेने रेल्वे स्थानक हद्दीत ‘फॅमिली मॉल’ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं दादर रेल्वे स्थानकात उतरताच प्रवाशांना खरेदीसाठी अन्यत्र कुठे न जाता स्थानक हद्दीतील शॉपिंग मॉलमध्ये जाता येणार आहे.  यात विविध प्रकारच्या वस्तू विक्रीबरोबरच लहान मुलांसाठी खेळही असणार असल्याची माहिती समोर येत आहे.

कोरोनामुळे गेल्या वर्षभरात मुंबई उपनगरीय रेल्वे प्रवासीसंख्या कमी झाली. त्यामुळे उत्पन्नावरही परिणाम झाला. उत्पन्न बरेच घटले. मध्य रेल्वेला वर्षभरात ७०३ कोटी रुपयांचा, तर पश्चिम रेल्वेला ६३६ कोटी रुपयांचा तोटा झाला. २०१९-२० मध्ये मध्य रेल्वेला ८२४ कोटी आणि पश्चिम रेल्वेला ७५४ कोटी रुपये उत्पन्न मिळाले होते. हेच उत्पन्न २०२०-२१ मध्ये कमी झाले आहे. त्यामुळे उत्पन्नासाठी रेल्वेची धडपड सुरू आहे.

मध्य रेल्वेने सीएसएमटीत आरामदायी प्रतीक्षालय उभारल्यानंतर दादर, एलटीटीतही आरामदायी प्रतीक्षालय होणार आहे. तर पश्चिम रेल्वेकडूनही मुंबई सेन्ट्रल टर्मिनसवर प्रतीक्षालय आणि अंधेरी, गोरेगाव, कांदिवली, बोरीवली, मुंबई सेन्ट्रल स्थानक हद्दीत ‘सलून’ उभारले जाणार आहे.

पश्चिम रेल्वेच्या दादर स्थानक हद्दीतही फॅमिली मॉल उभारण्याचा निर्णय घेतल्याची माहिती देण्यात आली. यासाठी निविदा काढण्यात आली असून ५ वर्षांचा करार असणार आहे.

विविध वस्तूंची दुकाने, प्रतीक्षालय, मुलांसाठी खेळ, एटीव्हीएम सुविधा, करमणुकीचे साधन, स्वागत कक्ष, सुरक्षा व्यवस्था, वाहनतळ अशा सुविधांचा समावेश असेल. उपनगरीय रेल्वे मार्गावरील दादर स्थानक हे सर्वात व्यग्र स्थानक असून प्रवाशांची गर्दी असते. अनेक प्रवासी केवळ खरेदीसाठी दादर स्थानकात उतरून बाहेर पडतात. त्यामुळे मॉल तयार करून त्यांना तेथेच सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे पश्चिम रेल्वेने सांगितले. यातून रेल्वेलाही काहीसे उत्पन्न मिळणार आहे

पुढील बातमी
इतर बातम्या