फास्टॅग वार्षिक पास 15 ऑगस्टपासून मिळणार

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशभरातील वाहनधारकांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. 15 ऑगस्टपासून भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) अंतर्गत येणाऱ्या टोल नाक्यांवरून प्रवास करणाऱ्यांसाठी फास्टॅग वार्षिक पास उपलब्ध होणार आहे. यामुळे प्रवासादरम्यान टोल नाक्यांवर होणारी गर्दी कमी होण्यासोबतच आणि वेळेची बचत देखील होणार आहेत.

हा वार्षिक पास 3000 रुपयांमध्ये खरेदी करता येईल आणि त्यामध्ये तुम्हाला एका वर्षात 200 टोल मुक्त फेऱ्या मिळतील. हा पास खासगी चारचाकी वाहने, जीप आणि व्हॅनसाठीच लागू आहे.

व्यावसायिक वाहनांसाठी मात्र ही योजना उपलब्ध नाही. 17 जून रोजी केंद्र सरकारने याबाबत अधिसूचना जारी केली होती. त्यामुळे प्रवाशांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. आता 15 ऑगस्टपासून फास्टॅग वार्षिक पास उपलब्ध होणार आहे.

हा पास खरेदी करण्यासाठी तुम्हाला NHAI च्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा त्यांच्या अॅपवर जावे लागेल. तिथे फास्टॅग पात्रतेची पडताळणी केल्यानंतर तुम्ही 3000 रुपयांचे ई-पेमेंट करू शकता. पेमेंट झाल्यावर दोन तासांत तुमचा पास अॅक्टिव्हेट होईल. हा पास एक वर्ष किंवा 200 फेऱ्यांसाठी वैध राहील. तसेच कोणत्याही वाहनांना हस्तांतरित करता येणार नाही किंवा दुसऱ्या वाहनासाठी वापरता येणार नाही.

हा पास पुणे-नाशिक, पुणे-सोलापूर आणि इतर द्रुतगती महामार्गांवर वापरता येईल. मात्र, मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे आणि नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर हा पास लागू होणार नाही, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.


हेही वाचा

गोराई खारफुटी उद्यानाचे उद्घाटन लांबणीवर

कल्याण-शिळफाटा मार्गावरील वाहतुकीत मोठे बदल

पुढील बातमी
इतर बातम्या