मुंबईच्या वेशीवर दोन महिन्यांनंतर फास्टॅग बंधनकारक

मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, मुंबई-पुणे जुना महामार्ग (एनएच ४८) आणि वांद्रे-वरळी सागरी सेतूवर २६ जानेवारीपासून फास्टॅग बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र मुंबईच्या वेशीवर दोन महिन्यांनंतर फास्टॅग बंधनकारक होईल, असे महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळाने (एमएसआरडीसी) स्पष्ट केले. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि जुना महामार्ग हे राज्याच्या अखत्यारीत आहेत. येथील सर्व टोल प्लाझाच्या सर्व मार्गिकांवर सध्या फास्टॅग यंत्रणा कार्यान्वित आहे. मात्र वाहनचालकांमध्ये याबाबत जागृती व्हावी, सर्वाना फास्टॅग घेण्यास पुरेसा वेळ मिळावा म्हणून २६ जानेवारीपर्यंत काही मार्गिका हायब्रिड (रोख आणि फास्टॅग दोन्ही एकत्र) पद्धतीने कार्यरत राहतील. २६ जानेवारीपासून फास्टॅग बंधनकारक असेल. त्याचबरोबर मुंबईतील वांद्रे-वरळी राजीव गांधी सागरी सेतूवरदेखील फास्टॅग बंधनकारक केले जाईल.

या तीनही ठिकाणी फास्टॅग वापरणे बंधनकारक झाल्यानंतर फास्टॅगविना असलेल्या वाहनास दुप्पट पथकर भरावा लागेल. तसेच टोल प्लाझावर फास्टॅग विकत घ्यावे लागेल. सध्या या सर्व टोलनाक्यांवर बँकांमार्फत फास्टॅग विक्री सुविधा उपलब्ध असून, ऑनलाइन माध्यमातूनदेखील फास्टॅग खरेदी करता येते. याबाबत महामंडळातर्फे जनजागृतीसाठी जाहिराती व इतर माध्यमांचा वापर करण्यात येणार आहे.

मुंबईच्या वेशीवरील ५ टोल नाके एमएसआरडीसीच्या अखत्यारीत असून, दहिसर वगळता चार टोल नाक्यांच्या काही मार्गिकावर ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवडय़ापासून महामंडळाने आपणहून पुढाकार घेऊन फास्टॅग कार्यरत केले. सर्व मार्गिकांवर फास्टॅग यंत्रणा कार्यरत करण्यासाठी तेथील रचनेत बदल तसेच काही ठिकाणी अतिरिक्त जागा अपेक्षित आहे, मात्र मुलुंड (पूर्व आणि पश्चिम) आणि दहिसर येथील नाक्यांवर तशी  जागा उपलब्ध नाही. त्यामुळे या ठिकाणी एमएसआरडीसीने पालिकेकडे अतिरिक्त जागा भाडेपट्टीवर मागितली आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर साधारण पुढील दोन महिन्यांत या सर्व नाक्यांवर फास्टॅगचा वापर बंधनकारक केला जाईल. सध्या ज्या टोल नाक्यांवर फास्टॅग आहे, तेथे एक वाहन केवळ ७ ते ८ सेकंदांत पार होते. तुलनेने रोख पैसे भरून व्यवहार पूर्ण करण्यास ३ ते ४ मिनिटे लागतात.

मुंबई-पुणे द्रुतगती तसेच जुन्या महामार्गावर २६ जानेवारीपासून फास्टॅग बंधनकारक असेल. मात्र अंमलबजावणीतील अडचणी सोडवून आणि प्रक्रिया पूर्ण करून मुंबईच्या वेशीवरील सर्व पाच टोलनाक्यांवर दोन महिन्यांनंतर फास्टॅग बंधनकारक असेल.

पुढील बातमी
इतर बातम्या