पहिल्याच दिवशी एसी लोकलने कमावले ६२ हजार ७४६ रुपये

सोमवारी २५ डिसेंबर म्हणजेच नाताळच्या दिवशी एसी लोकल मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाली. पहिल्याच दिवशी एसी लोकलने संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ६२ हजार ७४६ रुपयांची कमाई केली आहे. तर, या प्रवासादरम्यान योग्य तिकीट नसणाऱ्या एका व्यक्तीकडून ४३५ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

पहिल्या दिवशी फक्त ५ फेऱ्या

पहिल्या दिवशी एसी लोकलच्या फक्त ५ फेऱ्या चालवण्यात आल्या. या पाच फेऱ्यांमध्ये प्रवाशांचा लोकलला चांगला प्रतिसाद मिळाल्याचं पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.

पहिल्याच दिवशी तिकीट गोंधळ!

एसी लोकलचं नेमकं किती तिकीट आहे? याबाबत पूर्ण माहिती नसल्याकारणाने नॉर्मल ट्रेनने प्रवास करणारे मुंबईकर देखील सोमवारी एसी लोकलमध्ये चढले. त्यानंतर दुसऱ्या थांब्यावर जाऊन उतरले. त्यामुळे प्रत्येक स्थानकावर एसी लोकलचे वेगळे तिकीट काढल्याशिवाय प्रवाशांनी एसी लोकलमध्ये चढू नये, अशा उद्घोषणा करण्याची वेळ पश्चिम रेल्वे प्रशासनावर आली.

४३५ रूपयांचा पहिला दंड

त्यातूनच एका प्रवाशाला टीसींनी योग्य तिकीट नसल्यामुळे ४३५ रुपयांचा दंड ठोठावला आहे. आजच्या पहिल्याच दिवशी एसी लोकलच्या ५७९ प्रवाशांनी ४४६ तिकीटं विकत घेतली. त्यातून ६२,७४६ रूपयांची कमाई झाल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली आहे.


हेही वाचा

मुंबईकरांनो, 'जस्ट चिल'! एसी लोकल सेवेत रुजू

पुढील बातमी
इतर बातम्या