मध्य रेल्वेचं रडगाणे सुरूच, टिटवाळापर्यंतच धावतायत लोकल

मध्य रेल्वेचं रडगाणे रोजच सरू आहे. कोणत्या ना कोणत्या कारणाने लोकल बंद पडते. या सर्वांचा फटका मात्र प्रवाशांना बसत आहे. शुक्रवारी पहाटेही तेच झालं. मध्य रेल्वेच्या उंबरमाळी रेल्वे स्थानकात ओव्हरहेड वायर दुरुस्त करणारी व्हॅन रुळावरून घसरली. परिणामी कसारा ते आसनगाव दरम्यानची वाहतूक ठप्प झाली. यामुळे संतापलेल्या प्रवाशांनी वाशिंद रेल्वे स्थानकात रेल रोको आंदोलन केलं. या आंदोलनामुळे मध्य रेल्वेची वाहतूक टिटवाळा पर्यंतच सुरू आहे.

गुरुवारी मध्यरात्रीनंतर मध्य रेल्वेच्या ओव्हरहेड वायर दुरुस्त करणारी व्हॅन उंबरमाळी स्थानकात रुळावरून घसरली. दरम्यान ही व्हॅन रुळावर आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याने मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या तिथेच अडकल्या. सकाळ झाली तरी दुरुस्तीचं काम पूर्ण झालं नव्हतं. त्यामुळे कसारा रेल्वे स्थानकातून एकही लोकल सोडण्यात आली नाही. त्यामुळे कसारा ते आसनगाव दरम्यानची वाहतूक खोळंबल्याने प्रवासी संतप्त झाले.

संतापलेल्या प्रवाशांनी वाशिंद रेल्वे स्थानकात रेल रोको आंदोलन करत मध्य रेल्वे रोखून धरली. या रेल रोको आंदोलनामुळे रेल्वेची लोकल वाहतूक टिटवाळापर्यंतच सुरू असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या