गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखद होणार

गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना एक आनंदाची बातमी आहे. गणेशोत्सव हा कोकणातील सर्वात मोठा सण असतो. त्या निमित्तानं दरवर्षी गणेशोत्सव काळात मुंबई, पुण्यातून गणपती विशेष रेल्वे गाड्या सोडल्या जातात. गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनानं गणपती स्पेशल ट्रेनच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी ही माहिती दिली.

कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी गाड्यांच्या फेऱ्याही वाढवल्या जातात. यंदाही तशी सोय करण्यात आली आहे. मात्र, वाढती गर्दी लक्षात घेऊन यंदा पश्चिम रेल्वेनं फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे. सर्वप्रथम कोकणात गणपती स्पेशल ट्रेनच्या ७२ फेऱ्या होणार होत्या. त्यात आणखी ४० फेऱ्यांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता त्यात आणखी ३८ फेऱ्यांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळं यंदा गणेशोत्सव काळात कोकणात रेल्वेच्या तब्बल १५० फेऱ्या होणार आहेत.

३ ते १८ सप्टेंबर दरम्यान या गाड्या धावतील. या संदर्भातील अधिसूचना काढण्यात आली आहे. यापुढंही देखील वेटिंग लिस्ट वाढल्यास फेऱ्या आणखी वाढवण्यात येतील, असं दानवे यांनी स्पष्ट केलं आहे. 'कोकणात जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची पूर्ण काळजी केंद्र सरकार घेईल. गणपती उत्सव साजरा करण्यासाठी कोकणात जाताना कोणालाही अडचण होऊ नये, असा केंद्राचा प्रयत्न असल्याचंही दानवे यांनी सांगितलं.

पुढील बातमी
इतर बातम्या