आता हायफाय तेजस धावणार `मुंबई टू अहमदाबाद`

मुंबई - गोवा असा हायस्पीड प्रवास करणारी 'तेजस एक्स्प्रेस' आता मुंबई-अहमदाबाद या मार्गावरही धावणार आहे. मुंबई-गुजरात दरम्यान दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. ही संख्या लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने गुजरात मार्गावर अनेक गाड्या सुरू केल्या आहेत तसेच बुलेट ट्रेनसारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्पही आखण्यात आला आहे. मुंबईची नाळ गुजरातशी अधिक घट्ट जोडण्यासाठी  आता हाय-फाय तेजस एक्स्प्रेसचाही समावेश करण्यात आला आहे. 

याआधी 'तेजस' मुंबई-सूरत मार्गावर चालविली जाणार होती. पण, त्यात बदल करून ती आता मुंबई-अहमदाबाद मार्गावर चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या मुंबई-अहमदाबाद मार्गावर शताब्दी एक्स्प्रेस ही देशातील सर्वाधिक वेगवान गाडी धावते. ही गाडी तासाला 130 किमी वेगाने अंतर कापते. मुंबई-अहमदाबाद हा 493 किमीचा प्रवास शताब्दी एक्स्प्रेस 6 तास आणि 20 मिनिटांत पूर्ण करते. ही गाडी मुंबई सेंट्रलहून सकाळी 6.25 वाजता सुटून अहमदाबादला दुपारी 12.45 वाजता पोहोचते. तर अहमदाबादहून दुपारी 2.20 वाजता सुटून ही गाडी मुंबई सेंट्रलला रात्री 9.20 वाजता पोहोचते.

तेजस एक्स्प्रेस मुंबई सेंट्रलहून सकाळी लवकर सुटून शताब्दीच्या वेळेत पोहोचेल, असे तिच्या वेळेचे नियोजन करण्यात येणार आहे. तसेच परतीच्या वाटेवर दुपारी लवकरच निघण्यावर भर दिला जाणार आहे. सध्या मुंबई ते अहमदाबाद मार्गावर 25 फेऱ्या चालविण्यात येत असून त्यात शताब्दी, दुरांतोसह अन्य मेल/एक्स्प्रेसचा समावेश आहे. गोवा मार्गावर धावणारी तेजस 200 किमीच्या वेगाने धावू शकते. पण रेल्वे रूळ तेवढे सक्षम नसल्याने सध्या ती 130 च्या वेगाने धावत आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या