आरपीएफने घडवली माय-लेकाची भेट

  • शिवशंकर तिवारी & मुंबई लाइव्ह टीम
  • परिवहन

बोरिवली - आरपीएफ पोलिसांनी हरवलेल्या मुलाची त्याच्या आई-वडिलांशी भेट घडवून दिली आहे. आरपीएफ पोलीस 2 फेब्रुवारीला दुपारच्या सुमारास बोरीवली रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक पाचवर गस्त घालत होते. तेव्हा त्यांना एक नऊ वर्षांचा मुलगा एकटाच आढळला. काही काळ वाट पाहूनही जेव्हा त्या मुलाचे नातेवाईक दिसले नाहीत तेव्हा पोलिसांचा संशय बळावला. त्यानंतर पोलिसांनी त्या मुलाकडे विचारणा केली. मात्र घाबरलेल्या अवस्थेत असल्याने मुलाला कोणतीच माहिती देता आली नाही. हे पाहून पोलिसांनी तात्काळ त्या मुलाला बोरीवलीच्या आरपीएफ कार्यालयात नेले. तेव्हा त्याने आपलं नाव अमित चौबे असून नालासोपाऱ्यातल्या बिलालवाडा परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर बोरीवली आरपीएने चाइल्ड हेल्प लाइनच्या कर्मचाऱ्यांची मदत घेत मुलाला त्याच्या घरी सोडले. या वेळी त्याच्या आई-वडिलांनी पोलिसांचे आभार मानले. असं सांगितलं जात आहे की आई ओरडल्यामुळे तो घर सोडून निघून गेला.

पुढील बातमी
इतर बातम्या