महापरिनिर्वाण दिनानिमित्त हुसेनसागर एक्स्प्रेस मुंबईतून धावणार

महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी हजारो अनुयायी मुंबईत चैत्यभूमीवर येतात. प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन हुसेनसागर एक्स्प्रेस मुंबईपर्यंत चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. ४ ते ८ डिसेंबर या कालावधीत मुंबईहून हैदराबादसाठी ही गाडी रवाना होईल. 

मुंबई- पुणे दरम्यान लोणावळा घाटात सुरू असलेल्या कामांमुळे ऑक्टोबर महिन्यापासून हुसेनसागर एक्स्प्रेस मुंबई-पुणे दरम्यान रद्द केली होती. तसंच तीन पैकी एका मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आल्यामुळे काही मेल एक्स्प्रेस पूर्णत: आणि काही मेल एक्सप्रेस अंशतः रद्द केल्या होत्या. मात्र, महापरिनिर्वाण दिनानिमित्त होणारी गर्दी लक्षात घेऊन हुसेनसागर एक्स्प्रेस डिसेंबरपासून मुंबईतून चालवण्यात येणार आहे. 

 ट्रेन क्रमांक १२७०२ हैदराबाद-मुंबई ही एक्स्प्रेस ३ डिसेंबर रोजी पुणे स्थानकात रद्द न करता मुंबईपर्यंत धावणार आहे.  ट्रेन क्रमांक १२७०१ मुंबई- हैदराबाद हुसेनसागर एक्स्प्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पूर्व नियोजित वेळेनुसार धावणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली. 

एसटी ही सज्ज

एसटी महामंडळानं ६ डिसेंबर रोजी तब्बल १०० फेऱ्या चालवण्याची तयारी केली आहे. राज्यभरातील अनुयायी चैत्यभूमी मुंबई येथे येणार असल्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या विविध आगारातून गर्दीनुसार जादा बसेस सोडण्याच्या सूचना सर्व विभाग नियंत्रकांना देण्यात आल्या आहेत. यानुसार पनवेल-दादर, अलिबाग-पनवेल-दादर, भिवंडी-दादर-मुंबई या मार्गांवर दिवसभरात एसटीतर्फे शंभर फेऱ्या चालवण्यात येईल, अशी माहिती एसटी महामंडळाच्या जनसंपर्क विभागानं दिली.

पुढील बातमी
इतर बातम्या