एसटी कामगारांचे बेमुदत उपोषण सुरूच

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता देणं, घरभाडे भत्ता देणं यासह अन्य मागण्यांसाठी एसटी कामगारांनी बुधवारपासून उपोषण सुरु केलं आहे. परंतु या मागण्यांवर तोडगा न निघाल्यानं गुरुवारीही उपोषण सुरुच ठेवण्याचा निर्णय एसटी कामगार संघटनांच्या कृती समितीनं घेतला आहे.

उपोषणात कामगार सामील झाल्यानं राज्यातील ११ आगार पूर्णत: बंद राहिले. तर ४ आगार अंशत: बंद राहिल्यानं एसटी सेवांवर परिणाम झाला. विविध मागण्यांसाठी राज्यातील एसटी कामगार संघटनांनी उपोषण सुरु केलं असून, त्यात एसटीतील १७ संघटना सामील आहेत. मुंबईत आझाद मैदान येथे कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी उपोषणाला सुरुवात केली. यासह राज्यातील विभागीय कार्यालयांसमोरही कामगारांनी उपोषण केलं.

यात एकूण ११ आगारातील एसटीची सेवा पूर्णत: बंद झाली. तर अन्य विभागातील ४ आगार अंशत: बंद राहिले. परिणामी प्रवाशांचे काही प्रमाणात हाल झाले. शहरीबरोबरच ग्रामीण भागातही एसटी सेवा बंद राहिली. दरम्यान, एसटी कामगार संघटनांच्या कृती समिती सदस्यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक झाली.

मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल, असे आश्वासन देण्यात आले. तर संध्याकाळी परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांच्यासोबतही झालेल्या बैठकीत तोडगा निघाला नाही.

पुढील बातमी
इतर बातम्या