रेल्वे प्रवाशांसाठी आरोग्य सेतू अ‍ॅप आता बंधनकारक

१२ मे पासून देशातील काही भागांमध्ये १५ रेल्वे चालू करण्याचा निर्णय सरकारनं घेतला. ऑनलाईन तिकिट खरेदी करून प्रवास करता येतो. ११ मे पासून ऑनलाईन तिकिट विक्री सुरू झाली. आता रेल्वे मंत्रालयानं प्रवाशांसाठी आरोग्य सेतू अ‍ॅप अनिवार्य केलं आहे. रेल्वे मंत्रालयानं ट्विट करत या संदर्भात माहिती दिली आहे.

अॅप बंधनकारक

ज्यांच्या फोनमध्ये आरोग्य सेतू अ‍ॅप नसेल, त्यांना स्टेशनवरच अ‍ॅप डाउनलोड करण्यास सांगितलं जाईल. त्यानंतरच रेल्वेमध्ये प्रवेश दिला जाईल.

'या' मार्गावर धावणार रेल्वे

सध्या नवी दिल्ली स्टेशन ते डिब्रुगढ, आगरतला, होवराह, पाटना, बिलासपूर, रांची, भुवनेश्वर, सिकंदराबाद, बंगलुरू, चेन्नई, तिरूअनंतपूरम, मडगांव, मुंबई सेंट्रल, अहमदाबाद आणि जम्मू तावी या मार्गावर रेल्वे धावणार आहेत. या रेल्वेमध्ये केवळ एसी कोच असतील आणइ भाडे राजधानी रेल्वे एवढे असेल. याशिवाय तिकीट रद्द केल्यास ५० टक्के रक्कम कापली जाईल.

आरोग्य सेतु मोबाइल अ‍ॅप म्हणजे?

आरोग्य सेतु अ‍ॅप कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी डिझाइन केला आहे. आरोग्य सेतू अ‍ॅप लोकांना सांगेल की, तुम्ही कोरोना संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आला आहात की नाही. याशिवाय या अ‍ॅपद्वारे कोरोना इन्फेक्शनचा किती धोका आहे? हे देखील आपणास कळू शकेल.

अ‍ॅप कसे काम करते?

आरोग्य सेतु अॅप हिंदी, इंग्रजी आणि मराठी यासह ११ भाषांमध्ये उपलब्ध आहे. या अ‍ॅपमध्ये कोरोना विषाणूपासून बचाव करण्याच्या पद्धतीही नमूद केल्या आहेत. या व्यतिरिक्त, आपल्या प्रवासाच्या हिस्ट्रीनंतर आणि मुळात राहत असलेल्या जागेवरून कोरोना संक्रमणाचा धोका आहे की नाही हे अॅप आपल्याला सांगेल.

कसे डाऊनलोड कराल?

गुगल प्ले स्टोअरवरून अ‍ॅप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला नाव आणि मोबाईल क्रमांकासह नोंदणी करावी लागेल. यानंतर, भाषा निवडावी लागेल. आपण अ‍ॅप उघडताच अ‍ॅप आपल्याला कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका आहे की नाही ते सांगेल. या अ‍ॅपमध्ये खाली स्क्रोल केल्यानंतर आरोग्य मंत्रालयाचे एक ट्वीट मिळेल. डेटा गोपनीयतेबाबत सरकारनं म्हटलं आहे की, आरोग्य सेतु अ‍ॅपचा डेटा पूर्णपणे इनक्रिप्ट केला जाईल.


पुढील बातमी
इतर बातम्या