सर्वांसाठी लोकल सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली मुंबई लोकल सेवा सुरू झाली असली तरी अद्याप, सामान्यांसाठी लोकल प्रवास बंदच आहे. मात्र, येत्या आठवड्यात सर्वांसाठी लोकल सुरू होण्याबाबत निर्णय अपेक्षित असल्याचे राज्य सरकारने न्यायालयात स्पष्ट केलं आहे. त्यामुळं रेल्वे आंदोलन तूर्त स्थगित करण्याचा निर्णय रेल्वे प्रवासी महासंघानं घेतला आहे. शिवाय, सर्वांसाठी लोकल सुरू न झाल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असे ही महासंघाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

'लोकल सुरू करण्यासाठी सरकार सकारात्मक', 'सर्वांसाठी लोकल लवकरच', 'नव्या वर्षाच्या पहिल्या आठवड्यात लोकलमुभा', असे सरकारमधील मंत्र्यांनी अनेकदा सांगितले. मात्र, अद्याप सर्वांसाठी लोकल सुरू झालेली नाही. 'लांडगा आला रे आला', अशी गत ५० लाखांहून अधिक सामान्य मुंबईकरांची झाली. आता केवळ न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, असे रेल्वे प्रवासी महासंघाचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी म्हटलं.

राज्य सरकार सामान्यांना जुमानत नाही मात्र न्यायव्यवस्थेचा नक्कीच आदर ठेवतील. यामुळे सर्व संघटनांनी एकमतानं सध्या आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर मंगळवारपर्यंत सर्वांसाठी लोकल खुली न झाल्यास आंदोलन छेडण्यात येईल. याची सर्वस्वी जबाबदारी ही राज्य प्रशासनाची असेल, असाही इशारा देण्यात आलेला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या