लोकल ट्रेन महिनाभर जागेवरच उभ्या, नादुरूस्त होण्याची प्रशासनाला चिंता

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यसरकारनं मुंबईसह राज्यभरातील वाहतुकसेवा बंद केली आहे. परिणामी रेल्वे वाहतुकही बंद असल्यानं रेल्वे प्रशासनाला लोकल गाड्या नादुरूस्त होण्याची भीती आहे. त्यामुळं महिनाभराहून अधिक काळ जागीच असलेल्या लोकल गाड्या नादुरुस्त होऊ नये यासाठी प्रशासनाची बरीच धडपड सुरू आहे. गाड्यांचा देखभाल-दुरुस्तीचा प्रश्न उद्भवू नये यासाठी त्याच्या चाचणीसाठी रेल्वे आठवड्यातून एकदा लोकल थोड्याफार चालविल्या जातात.

पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर दिवसभरात एकूण तीन हजारपेक्षा जास्त लोकल फेऱ्या होतात. सध्या लॉकडाऊनमुळं या गाड्या कारशेड, सायडिंग इत्यादी ठिकाणी उभ्या आहेत. एखादी दुचाकी, चारचाकीही ३ ते ४ दिवस न चालवल्यास पुन्हा सुरू होताना बराच वेळ घेते. बस आणि रेल्वे ही मोठी वाहनांबाबतही तशी समस्या उद्भवू शकते.  म्हणून रेल्वे प्रशासन काळजी घेत आहे.

सध्या मध्य रेल्वेकडे १५५, तर पश्चिम रेल्वेकडे साधारण १०० लोकल आहे. याशिवाय दोन्हींकडे वातानुकूलित लोकलही आहे. मध्य रेल्वेने ८० लोकल सायडिंगला उभ्या केल्या असून ७५ लोकल कारशेडमध्ये आहेत. या गाड्यांचे पार्किंग ब्रेक, मोटार के बल इत्यादींची नियमित तपासणी केली जात असल्याची माहिती मिळते. लोकल सुरू राहावी यासाठी ती २ स्थानकांदरम्यान चालवली जाते.

त्या किमान ४०० ते ८०० मीटपर्यंत तरी चालविल्या जातात. हे काम आठवड्यांतून एकदा केले जाते. कारशेडमधील लोकलच्या  बाबतीत हे शक्य नाही. मग त्या जागीच पुढे-मागे चालविल्या जातात.  मेल-एक्स्प्रेस गाड्यांबाबतही ही काळजी घेण्यात येते. हे उपाय पश्चिम रेल्वेकडूनही लोकल व एक्स्प्रेसच्या देखभालीसाठी योजले जात आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या