रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारचा विशेष कृती आराखडा

महाराष्ट्रातील रेल्वे स्थानके आणि त्याच्या परिसरातील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकार विशेष कृती आराखडा तयार करण्यात आला आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिली.

विशेषतः संवेदनशील रेल्वे स्थानकांवरील सुरक्षा अधिक मजबूत करण्यावर या आराखड्यात भर दिला जाणार आहे.

आमदार रवींद्र फाटक यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना योगेश कदम यांनी सांगितले की, रेल्वे पोलीस, स्थानिक पोलीस आणि रेल्वे प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी आणि प्रवाशांची सुरक्षा वाढवण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

संवेदनशील स्थानकांची पाहणी

राज्यातील संवेदनशील रेल्वे स्थानके आणि परिसराची ओळख पटविण्यात आली आहे. त्या ठिकाणांची पाहणी करण्याची जबाबदारी संयुक्त पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. हे अधिकारी प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने आवश्यक असलेल्या सुरक्षा उपाययोजनांबाबतचा अहवाल सरकारला सादर करणार आहेत.

मुंबईतील लोकल फेऱ्या आणि डबे वाढविण्याची मागणी

मुंबई उपनगरीय रेल्वेवरील वाढत्या प्रवासी भाराचा विचार करून लोकलच्या फेऱ्या आणि डब्यांची संख्या वाढविण्याची मागणी राज्य सरकार केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून मांडणार असल्याचेही कदम यांनी स्पष्ट केले.

स्थानकांवरील गुन्हेगारीवर संयुक्त कारवाई

रेल्वे स्थानके आणि प्लॅटफॉर्मवर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींचा वावर असल्याचे मान्य करत, रेल्वे पोलीस आणि रेल्वे प्रशासन संयुक्तपणे सर्व प्रमुख स्थानकांवर विशेष मोहिमा राबवून गुन्हेगारांवर कठोर कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच रेल्वे स्थानकांवर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यात येणार असून, फेशियल रेकग्निशन (चेहरा ओळखणारी प्रणाली) असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढविण्याची योजना सरकारने आखली आहे.

रेल्वे डब्यांतील सुरक्षेचाही आढावा

रेल्वे डब्यांमधील सुरक्षा व्यवस्थेचाही केंद्र सरकारच्या समन्वयाने आढावा घेऊन आवश्यक सुधारणा केल्या जाणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्र्यांनी दिली.

महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाय

महिलांच्या सुरक्षेबाबत करण्यात आलेल्या सूचनांवर बोलताना कदम म्हणाले की, सध्या रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत उपलब्ध असलेली विशेष सुरक्षा व्यवस्था आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सकाळी 8 वाजेपर्यंत वाढविण्याबाबत सरकार सकारात्मक विचार करणार आहे.

मकोका अंतर्गतही कारवाईचा इशारा

रेल्वे परिसरात कार्यरत गुन्हेगार टोळ्या आणि अमली पदार्थांच्या व्यसनाधीन व्यक्तींविरोधातील कारवाईचा आढावा घेण्यासाठी पुढील 15 दिवसांत रेल्वे पोलीस आयुक्तांसोबत उच्चस्तरीय बैठक घेण्यात येणार असल्याची घोषणा कदम यांनी केली.

तसेच, ज्या प्रकरणांमध्ये कायदेशीरदृष्ट्या लागू होईल, त्या ठिकाणी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) यासह कठोर कायद्यांनुसार कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधान परिषदेला आश्वासन दिले की, राज्य सरकार आपल्या अधिकारक्षेत्रातील सर्व आवश्यक उपाययोजना करेल तसेच केंद्र सरकारच्या समन्वयाने महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी अधिक सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील.


हेही वाचा

बीकेसीतील मेट्रो प्रवाशांसाठी प्रत्येक शुक्रवारी मोफत फीडर बस सेवा

पुढील बातमी
इतर बातम्या