ओला, उबेर टॅक्सींसाठी सरकारचे नवे नियम

मुंबई - प्रवाशांना सुरक्षित आणि किफायतशीर प्रवास मिळावा यासाठी ओला आणि उबेर टॅक्सीसाठी ‘महाराष्ट्र टॅक्सी नियम 2017’ लागू करण्यात आला आहे. अनेक मोठ्या शहरांमध्ये संकेतस्थळावर आधारित टॅक्सी सेवा कार्यरत आहेत. यामध्ये ओला, उबेर, टॅक्सी फॉर श्युअर अशा टॅक्सी सेवा आहेत. प्रवाशांची मागणी आणि पुरवठा या आधारावर प्रवाशांकडून भाडे आकारणी होत असल्याने गर्दीच्या काळात जास्त भाडे आकारणी करत असल्याच्या तक्रारी अनेक प्रवाशांकडून केल्या जातात. तसेच काही विपरीत घटना घडल्यास टॅक्सी सेवा देणाऱ्या कंपन्या त्यांच्यावरील जबाबदारी झटकून मोकळे होतात. प्रवाशांना सुरक्षित आणि किफायतशीर प्रवासाची साधने उपलब्ध करुन देणे आवश्यक असल्याने ‘महाराष्ट्र टॅक्सी नियम 2017’ लागू करण्यात आला आहे. 

काय आहेत या नियमावलीची प्रमुख वैशिट्ये -

  • कंपनीस ज्या शहरात व्यवसाय करायचा आहे त्या ठिकाणी नोंदणी करणे बंधनकारक राहील
  • 'अॅप आधारीत टॅक्सी परवाना' असा स्वतंत्र परवाना टॅक्सींसाठी देण्यात येईल. अशा टॅक्सी वातानुकूलीत असतील
  • या टॅक्सी स्वच्छ इंधनावर चालणाऱ्या असतील
  • या टॅक्सीमध्ये किंवा टॅक्सीच्या चालकाकडे GPS/GPRS यंत्रणा असावी तसेच वाहनात मार्गक्रमण केलेले अंतर, मार्ग आणि भाडे दर्शवणारा निर्देशक असेल
  • कंपनीकडे कार्यरत नियंत्रण कक्ष असेल. टॅक्सीमध्ये प्रवासी बसल्यावर नियंत्रण कक्षही वाहनाच्या संपर्कात असणे आवश्यक आहे
  • कोणत्या कंपनीकडे कोणत्या टॅक्सी नोंदणीकृत आहेत याची माहिती देण्यात येईल
  • सध्याच्या काळ्या पिवळ्या टॅक्सींनाही कंपनीकडे नोंदणी करुन अॅप आधारित टॅक्सी चालवता येईल. मात्र गर्दीच्या वेळेत अॅप आधारित आणि कमी गर्दीच्या काळात नेहमीच्या मीटर पद्धतीने टॅक्सी चालविता येणार नाही
  • प्रवाशांना प्रवासाचे देयक देणे बंधनकारक राहील. सदर देयक कागदी देयक अथवा अन्य इलेक्ट्रॉनिक पद्धतीचे असू शकेल
  • प्रवासाचे भाडे सरकारकडून किमान आणि कमाल पद्धतनीने निश्चित करुन देण्यात येईल
  • टॅक्सीच्या स्वरुपानुसार भाड्याचे दर वेगवेगळे असतील
पुढील बातमी
इतर बातम्या