माटुंगा रोड स्थानकावरही 'महिला'राज, स्थानकाचं पूर्ण काम महिला पाहणार!

मध्य रेल्वेप्रमाणेच पश्चिम रेल्वेवरही महिला सक्षमीकरणासाठी पुढाकार घेतला जाणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा स्थानकानंतर आता पश्चिम रेल्वेच्या माटुंगा रोड रेल्वे स्थानकाचं कामकाज आणि देखभालही पूर्णपणे महिला कर्मचाऱ्यांकडून करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ८ मार्चला जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.

माटुंगा स्टेशनचं कामकाज पाहतात महिला

सर्व रेल्वे मंडळांनी महिला विशेष स्थानकासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना रेल्वे मंत्रालयाने केल्या आहेत. त्यानुसार, मध्य रेल्वेच्या माटुंगा स्थानकाचे सर्व कामकाज महिला पाहतात. पण आता पश्चिम रेल्वेने महिला विशेष स्थानकासाठी माटुंगा रोड स्थानकाची निवड केली आहे.

८ मार्चपासून माटुंगा रोडचा चार्ज महिलांकडे!

माटुंगा रोड स्थानकात दोन प्लॅटफॉर्म आहेत. तिकीट तपासनीस, बुकिंग अधिकारी, स्वच्छता कर्मचारी आणि स्थानक सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी अशा सर्व ठिकाणी महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती पूर्ण झाली आहे. संबंधित महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ८ मार्चपासून स्थानकाचा ‘चार्ज’ घेण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत.

३१ महिला कर्मचारी कामकाज सांभाळणार

जागतिक महिला दिनापासून माटुंगा रोड हे स्थानक महिला विशेष स्थानक म्हणून कार्यान्वित होईल. या स्थानकात एकूण ३१ महिला कर्मचारी कार्यरत होणार असून यामध्ये १३ स्वच्छता कर्मचारी, ३ तिकीट तपासनीस, ११ बुकिंग कार्यालय, ४ रेल्वे सुरक्षा बल महिला कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. या कर्मचाऱ्यांकडून माटुंगा रोड स्थानकाची देखभाल केली जाणार असून यापुढे ही सर्व कामे महिलाच करणार असल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रविंद्र भाकर यांनी सांगितले.

सद्य:स्थितीत माटुंगा रोड स्थानकात १ स्थानक व्यवस्थापक, ३ तिकीट तपासनीस, ५ रेल्वे सुरक्षा बल कर्मचारी, बुकिंग कार्यालयात कार्यरत असणारे सुमारे १३ कर्मचारी आणि ३ स्वच्छता कर्मचारी असे एकूण २५ कर्मचारी आहेत.


हेही वाचा

मध्य रेल्वेच्या माटुंगा स्थानकाची लिम्का बुक रेकॉर्डमध्ये नोंद

पुढील बातमी
इतर बातम्या