रविवारी मध्य, हार्बरवर मेगाब्लॉक, तर पश्चिम रेल्वेवर जम्बोब्लॉक

येत्या १७ डिसेंबर म्हणजेच रविवारी रेल्वे मार्गावरील ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा, रेल्वे रुळांच्या दुरुस्ती आणि देखभालीच्या कामासाठी मध्य, हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावर जम्बोब्लॉक घेण्यात येईल.

मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक

मध्य रेल्वेवर कल्याण ते ठाणेच्या अप जलद मार्गावर सकाळी ११.१५ ते दुपारी ४.१५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. यादरम्यान कल्याणहून सुटणाऱ्या अप जलद मार्गाच्या फेऱ्या सकाळी १०.५४ ते दुपारी ४.१९ पर्यंत ठाण्यापर्यंत अप धीम्या मार्गावर चालवण्यात येतील. ठाणे आणि सीएसटीएमपर्यंत लोकल नियमित अप जलद मार्गावर चालवण्यात येतील. या लोकल मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, दादर स्थानकावर थांबतील.

सकाळी १०.१६ ते दुपारी ३.२२ पर्यंत सीएसटीएमहून सुटणाऱ्या सर्व डाऊन जलद लोकल आपल्या निर्धारित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने धावणार असून या लोकल घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड स्थानकांवर थांबतील.

रविवारी रत्नागिरी-दादर पॅसेंजरचा अंतिम थांबा दादरऐवजी दिवा स्थानकांत असणार आहे. परतीच्या मार्गावर दादर-रत्नागिरी पॅसेंजरदेखील दिवा स्थानकावरून सुटेल. या ब्लॉकच्या कालावधीत मुंबईकडे ये-जा करणाऱ्या मेल-एक्स्प्रेस सुमारे अर्धा तास उशिरा धावतील.

हार्बर मार्गावरील ब्लॉक

हार्बर मार्गावरील नेरुळ ते पनवेल स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.३० ते दुपारी ४.३० पर्यंत मेगाब्लॉक असेल.

ब्लॉकदरम्यान हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन लोकल गाड्यांची वाहतूक सकाळी ११.०६ ते दुपारी ४.३० वाजेपर्यत नेरुळ ते पनवेल स्थानकांदरम्यान बंद राहणार आहे.

ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकलगाड्या देखील सकाळी ११.०२ ते दुपारी ४.२६ वाजेपर्यंत पनवेल ते नेरुळ आणि पनवेल ते अंधेरी लोकल बंद असणार आहे. या मार्गावर प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी ते नेरुळ आणि वाशीदरम्यान स्पेशल लोकल चालवण्यात येतील.

पश्चिम रेल्वे मार्गावर जम्बोब्लॉक

पश्चिम रेल्वेवरच्या बोरीवली ते नायगाव या स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ च्या दरम्यान हा जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे

जम्बोब्लॉकदरम्यान सर्व अप धीम्या मार्गावरील गाड्या फास्ट ट्रॅकवर वळवण्यात येतील. दरम्यान विरार-वसई रोड ते बोरीवली-गोरेगाव दरम्यानची अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील वाहतूक अप आणि डाऊन जलद मार्गावरून चालवण्यात येईल. ब्लॉक दरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील काही लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या