मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा, रेल्वे रुळांच्या दुरुस्ती देखभालीसाठी रविवारी मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. 

कल्याण ते ठाणे स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर सकाळी 11.15 ते दुपारी 4.15 वाजेपर्यंत दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. ब्लॉक दरम्यान कल्याण ते ठाणे मार्गावरील अप जलद वाहतूक अप धिम्या मार्गावर वळवण्यात येईल. परिणामी या लोकल गाड्या काही मिनिटे उशिराने धावणार आहेत. तसेच डाऊन जलद मार्गावरील लोकल गाड्यांना सकाळी 10.08 ते दुपारी 2.42 या वेळेत घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड या स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे. त्यामुळे या गाड्या आपल्या निर्धारित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिराने धावतील. ब्लॉकदरम्यान अप मार्गावरील 50104 रत्नागिरी-दादर पॅसेंजर गाडी दिवा स्थानकांपर्यतच चालवण्यात येणार असून तेथूनच डाऊन दिशेला 50103 दादर-रत्नागिरी पॅसेंजर गाडी रवाना करण्यात येणार आहे.

हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी स्थानकादरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.10 ते संध्याकाळी 4.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. ब्लॉकदरम्यान कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील रेल्वे वाहतूक सकाळी 10.20 ते दुपारी 3.48 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. हार्बर मार्गावरील प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल स्थानकांदरम्यान विशेष गाड्या चालवण्यात येतील. यादरम्यान हार्बर मार्गावरील प्रवासी सकाळी 10 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत ट्रान्सहार्बर आणि मेन लाईनने प्रवास करू शकतील.

पुढील बातमी
इतर बातम्या