एमएमआरसीकडून 16,000 रोपट्यांचे वाटप

मेट्रो-3 अंतर्गत शेकडो झांडाची कत्तल करणाऱ्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला मोठ्या टीकेला आणि विरोधाला सामोरे जावे लागत आहे. यावर उतारा म्हणून एमएमआरसीने मेट्रो-3 प्रकल्पात लाखो झाडे लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आतापर्यंत 16,000 हून अधिक रोपट्यांचे वाटप करण्यात आल्याची माहिती मंगळवारी एमएमआरसीच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी दिली आहे.

मेट्रो-3 मध्ये 1.074 झाडांची कत्तल करण्यात येणार असून, 1,727 झाडे काढून त्यांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. पर्यावरण प्रेमींनी मात्र या कत्तलीला विरोध केला असून, यासाठी थेट न्यायालयात धाव घेतली आहे. तर न्यायालयाने यावरील सुनावणी दरम्यान झाडे तोडण्यास स्थगिती दिली आहे. कुलाबा, फोर्ट, कफ परेड, गिरगाव, खार, अंधेरी, सांताक्रुझ, मरोळ, आरे अशा अनेक ठिकाणच्या पर्यावरण प्रेमींनीही एकवटून सेव्हट्रीची हाक देत झाडांच्या कत्तलीविरोधातील आवाज आणखी बुलंद केला आहे. यामुळे एमएमआरसीची चांगलीच कोंडी झाली आहे. या धर्तीवर एमएमआरसीने संपूर्ण मेट्रो परिसर हिरवागार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शिवाजी पार्क, हुतात्मा चौक, कामा हॉस्पीटल, विद्यानगरी यासह 25 ठिकाणी आतापर्यंत 16,000 रोपटी वाटण्यात आली आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या