ओला, उबर चालकांच्या संपाला राज ठाकरेंचा पाठिंबा

मागील १० दिवसांपासून अ‍ॅप बेस्ड ओला, उबरच्या चालक-मालकांनी विविध मागण्यासाठी संप पुकारलेला आहे. या संपाच्या पार्श्वभूमीवर ओला, उबरच्या चालकांनी बुधवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी राज यांनी मनसेची वाहतूक सेना ओला, उबरच्या चालकांच्या पाठीशी असल्याचं स्पष्ट केलं.

संपावर ठाम

कंपनीच्या प्रतिनिधींसोबत या टॅक्सी चालक-मालकांच्या झालेल्या बैठकीत ८० टक्के मागण्या मान्य करण्यात आल्या, असं महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाकडून सांगण्यात येत आहे. तरीही, मालक-चालक १०० टक्के मागण्या पूर्ण होईपर्यंत संपावर ठाम आहेत.

'या' मागण्या मान्य

प्रति किलोमीटर दरात अनुक्रमे १२, १५ आणि १९ रुपयांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रति किलोमीटरमागे आता या कंपन्यांकडून कमिशन आकारण्यात येणार नाही. त्याचबरोबर कंपनीने ‘लीज कॅब’ न घेण्याबाबतची मागणीदेखील मान्य केली आहे. अशा प्रकारच्या मागण्या ओला-उबर व्यवस्थापनाने मान्य केल्या आहेत.

गुरूवारी पुन्हा बैठक

ओला, उबरच्या चालकांच्या आंदोलनामुळे या कॅबने नियमितपणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चांगलाचा फटका बसत आहे. दरम्यान चालकांच्या मागण्यांवर गुरुवारी दुपारी ३ वाजता पुन्हा बैठक होणार असून या बैठकीत तोडगा निघेपर्यंत हे आंदोलन सुरुच राहणार असल्याचं संघाकडून सांगण्यात येत आहे.


हेही वाचा-

ओला, उबरच्या चालक-मालकांच्या संपावर गुरुवारी निघणार तोडगा?

ओला, उबरच्या आंदोलनात चालकाला मारहाण, ४ जणांना अटक


पुढील बातमी
इतर बातम्या