'भारत बंद'चा एसटी महामंडळाला फटका

कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी संघटनांनी मंगळवारी 'भारत बंद' आंदोलन केलं. या आंदोलनामुळं एसटी महामंडळाच्या बस सेवांवर काहीसा परिणाम झाला. ठिकठिकाणी निदर्शने, पोलीस व स्थानिक एसटी प्रशासनानं घेतलेली खबरदारी आणि प्रवाशांनीही फिरवलेली पाठ यामुळे दुपापर्यंत एसटीच्या १८ हजार ८८२ फेऱ्यांपैकी ७ हजार ४७० फेऱ्या रद्द झाल्याची माहिती समोर येत आहे.

शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या बंदमुळे एसटी सेवांवर परिणाम होऊ नये म्हणून प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आली होती. त्या-त्या जिल्ह्यातील परिस्थितीचा अंदाज घेऊन आणि स्थानिक प्रशासन, पोलिसांशी चर्चा करूनच एसटी सोडण्याच्या सूचना मुख्यालयाकडून एसटी विभागीय अधिकारी, आगारप्रमुखांना केल्या होत्या.

कोल्हापूर, पुणे, बुलढाणा यासह काही विभागात शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली. तसेच या भागात निर्माण झालेलं काहीसं तणावाचं वातावरण पाहता महामंडळानं फेऱ्या रद्द केल्या. तर बंदमुळं प्रवाशांनीही प्रवास करणं टाळल्यानं फेऱ्या रद्द झाल्या. परिणामी एसटी महामंडळाला आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागलं. मुंबई आणि ठाणे विभागातील बस फेऱ्यांवरही काहीसा परिणाम झाला.

कोल्हापूर विभागात दुपारी ४ पर्यंत १,१०३ बस फेऱ्या सुटणार होत्या. परंतु यातील ६५९ फेऱ्या रद्द करण्यात आल्या. बुलढाणा विभागातील ६७१ पैकी ६६२ फेऱ्यांपाठोपाठ नांदेड विभागातील ७८८ पैकी ६१२ फेऱ्या, पुणे विभागातील ६९१ पैकी २६३ फेऱ्याही रद्द झाल्याचे सांगण्यात आले.

पुढील बातमी
इतर बातम्या