एसटीचे सारथ्य आता महिलांकडे; चालकाबरोबरच वाहकाचीही जबाबदारी

एसटी महामंडळाच्या बसगाड्यांचे सारथ्य आता महिलाही करणार आहेत. त्यांना चालकाबरोबरच वाहकाचीही जबाबदारी सांभाळावी लागणार आहे. एसटी महामंडळात २१५ महिलांच्या चालक-वाहक या दुहेरी जबाबदारीच्या प्रशिक्षणाला सुरुवात झाली आहे. त्यांत आदिवासी भागातील २१ महिला आहेत.

एसटीत चालक-वाहक म्हणून प्रथमच महिलांची नियुक्ती करण्यात येईल. त्यांचे प्रशिक्षण सुरू झाले असून वर्षभरानंतर त्या सेवेत दाखल होतील, असे एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी म्हटलं.

एसटीत सध्या ४,५०० महिला वाहक आहेत. गेल्या १० ते १५ वर्षांपासून त्या सेवेत आहेत. आता चालक म्हणूनही महिला काम करणार आहेत. महिला चालकांची भरती प्रक्रिया साधारण २०१९ मध्ये सुरू झाली. सर्वसाधारण भागांतील १९४ आणि आदिवासी भागातील २१ महिलांची निवड करण्यात आली. त्यांचे प्रशिक्षण सुरू करण्यात आले. त्यानंतर शिकाऊ अनुज्ञप्ती (लायसन्स) प्रशिक्षण आणि अंतिम चाचणी घेतल्यानंतर या महिला चालक २०२१मध्ये सेवेत रुजू होणे अपेक्षित होते. परंतु करोनामुळे त्यांचे प्रशिक्षणच थांबले.

या उमेदवारांचे प्रशिक्षण सुरू झाले आहे. वर्षभरात त्या सेवेत दाखल होतील. पुण्यातील भोसरी येथे एसटीचे मोठे चाचणी पथ असून तेथे अंतिम चाचणी होऊन त्यांची अंतिम निवड करण्यात येईल. एसटी चालक-वाहक पदासाठी आदिवासी आणि दुष्काळग्रस्त भागातील महिलांची निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार २१ महिला आदिवासी भागातील आहेत. उर्वरित दुष्काळग्रस्त भागातील असल्याचे सांगण्यात आले. त्यांची नियुक्ती पुणे, नाशिक, नागपूर, वर्धा, अमरावती, बुलढाणा, जळगाव, सांगली विभागांत करण्यात येईल.

पुढील बातमी
इतर बातम्या