मुंबईतील वाढत्या उकाड्यामुळे एसी लोकलला प्रवाशांची मोठी पसंती

मे महिन्यात मुंबईतील वाढत्या उकाड्यामुळे प्रवाशांचा कल एसी लोकलकडे वाढला आहे. पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) एसी उपनगरीय सेवांना मोठी पसंती मिळाली आहे. 11 मे 2026 रोजी एका दिवसात तब्बल 50 हजारांहून अधिक एसी लोकल तिकिटे आणि पास विकले जाऊन नवा विक्रम नोंदवला गेला.

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, 11 मे रोजी एसी लोकलसाठी 50,663 तिकिटे आणि पास विकले गेले. ज्यातून सुमारे 1.60 कोटी रुपयांचा महसूल मिळाला. यापूर्वी 4 मे रोजी 47,475 तिकिटे आणि पास विक्रीचा विक्रम झाला होता.

1 ते 31 मे 2026 दरम्यान पश्चिम रेल्वेच्या एसी लोकलमधून तब्बल 58.9 लाख प्रवाशांनी प्रवास केला. या कालावधीत एसी लोकल सेवेतून 28.10 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत यात 28.67 टक्क्यांची वाढ झाली आहे.

वाढती मागणी लक्षात घेता पश्चिम रेल्वे भविष्यात एसी लोकल फेऱ्यांची संख्या वाढवण्याच्या विचारात आहे. सध्या आठवड्याच्या कामकाजाच्या दिवशी 145 एसी लोकल फेऱ्या चालवल्या जातात, तर शनिवार आणि रविवारी 118 फेऱ्या चालवल्या जातात.

जानेवारी ते मे 2026 दरम्यान पश्चिम रेल्वेने 52.4 लाख एसी लोकल तिकिटे आणि पास विकून सुमारे 119 कोटी रुपयांचा महसूल मिळवला. 2025 च्या याच कालावधीत 40.7 लाख तिकिटे विकली गेली होती आणि 97 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते.

दरम्यान, एसी लोकलमधील विनातिकीट प्रवासाविरोधातही कारवाई वाढवण्यात आली आहे. मे 2026 मध्ये 18,305 विनातिकीट प्रवासी आढळून आले असून त्यांच्याकडून 56 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मे 2025 मध्ये ही संख्या 4,320 इतकी होती.

उन्हाळ्यात एसी लोकलला वाढती पसंती मिळत असल्याने प्रवाशांच्या सोयीसाठी आणि वाढत्या गर्दीचा सामना करण्यासाठी पश्चिम रेल्वे एसी सेवा अधिक मजबूत करण्याच्या तयारीत आहे.


हेही वाचा

BEST कडून इलेक्ट्रिक बस चालकांना 4 आठवड्यांचे विशेष प्रशिक्षण अनिवार्य

पुढील बातमी
इतर बातम्या