'नाना शंकर शेट' सेंट्रल टर्मिनस

पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई सेंट्रल टर्मिनसचं लवकरच 'नाना शंकर शेट सेंट्रल टर्मिनस' नामकरण होणार आहे. यासंदर्भात केंद्र सरकारची सकारात्मक भूमिका आहे. केंद्र सरकारकडून नामकरणाची प्रक्रिया सुरु आहे, अशी माहिती खासदार अरविंद सावंत यांनी दिली. 

लवकरच पुढील स्थानक 'नाना शंकर शेट सेंट्रल' अशी उद्घोषणा प्रवाशांना ऐकू  येणार आहे. 'मुंबई सेंट्रल टर्मिनसचं नामकरण ‘नाना शंकर शेट’ टर्मिनस करण्याच्या विनंती संदर्भात केंद्रीय गृह राज्य मंत्री नित्यानंद राय यांना पत्र लिहिलं होतं. या पत्राला राय यांनी सकारात्मक उत्तर दिलं. स्थानकाच्या नाव बदलण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती राय यांनी दिली. दरम्यान, राज्य सरकारची परवानगी मिळाली असून केंद्राकडून देखील परवानगी मिळाल्यानं स्थानकाचं नामकरण करण्यावर शिक्कामोर्तब झाला आहे, असं अरविंद सावंत यांनी म्हटलं.

भारतीय रेल्वेचे जनक मुंबईचे आद्य शिल्पकार नाना शंकर शेट नाव देण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. नामदार जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेट प्रतिष्ठान यांच्यावतीनं तत्कालीन मुख्यमंत्र्यांना निवेदने देण्यात आली होती. त्यानंतर अखेर राज्य सरकारनं विधिमंडळात प्रस्ताव मंजूर केला. हा प्रस्ताव केंद्र सरकारकडं पाठविण्यात आला होता.

नामकरण करण्याविषयी केंद्र सरकारकडून विलंब होण्याचं कोणतंही कारण नाही. यासंदर्भात केंद्रीय गृह राज्य मंत्री नित्यानंद राय यांना पत्र लिहिलं. यावर राय यांनी माहिती दिली की, नामांतराला केंद्र सरकार सकारात्मक आहे. केंद्र सरकारकडून याबाबत प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि नाना शंकर शेट यांचे नाव मुंबई सेंट्रल टर्मिनसला मिळेल, असे अरविंद सावंत यांनी म्हटलं.

पुढील बातमी
इतर बातम्या