मुंबई लोकलनं प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लोकल प्रवासाची सर्वसामान्यांची प्रतिक्षा आता लवकरच संपणार आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत होणारी घट लक्षात घेता, प्रशासनानं मुंबईत लोकल सर्वांसाठी खुली करण्यासाठी हालचाली सुरू केल्याची माहिती समोर येत आहे. एका वृत्तपत्रात दिलेल्या माहितीनुसार, येत्या आठवड्यात होणाऱ्या महत्त्वपूर्ण बैठकीत लोकलमुभेची तारीख निश्चित होणार असल्याचं समजतं. त्यानंतर स्वस्त आणि आरामदायी प्रवासासाठी सर्वांना मुंबई लोकलचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई लोकल सेवा बंद ठेवण्यात आली होती. जवळपास ३ महिने बंद असलेली लोकल अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आली. नवी नियमावली आखत प्रवाशांना रेल्वे प्रवासाची मुभा दिली. त्यानंतर हळुहळू बॅंकेचे कर्मचारी, वकील, मुंबईचे डबेवाले आधी सरकारी व खासगी कर्मचारी यांनाही लोकल प्रवासास राज्य सरकार व महापलिका प्रशासनानं परवनागी दिली. विशेष म्हणजे यंदाच्या नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर महिला प्रवाशांसाठीही लोकल प्रवास सुरू करण्यात आला. मात्र सर्वसामान्यांसाठी अद्याप लोकलची दार बंदच होती.
मात्र, आता सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. येत्या आठवड्यात होणाऱ्या बैठकीत राज्य, महापालिका, रेल्वे अधिकारी असणार आहेत. १५ डिसेंबरनंतर सर्वांना लोकलमुभा देण्याची तयारी प्रशासनाने केली असून, या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. कोरोनासह जगण्याची सवय आता मुंबईकरांच्या अंगवळणी पडल्याचे स्पष्ट होते. अशावेळी रस्त्यांवरील खड्डे, वाहतूक कोंडी अशा प्रवासात होणारी दमछाक टाळण्यासाठी आता उर्वरित प्रवासी वर्गाला देखील लोकलमुभा देण्याची तयारी अंतिम टप्प्यात पोहचली आहे.
सुट्टीनिमित्त बाहेरगावी गेलेले मुंबईकर आता परतू लागले आहेत. सध्या नियंत्रणात असलेला कोरोना पुन्हा वाढू नये. यासाठी प्रशासनाकडून दक्षता घेण्यात येत आहे. आगामी आठवड्याच्या शेवटी अर्थात ११-१२ डिसेंबरला बैठक आयोजित करण्यात आली आहे. यात कोरोना स्थितीचा आढावा घेऊन लोकल प्रवासाबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचं महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी म्हटलं.