गणेशोत्सवानिमित्त प्रवाशांना मुंबई ते कुडाळ गारेगार प्रवासाची संधी

मध्य रेल्वेने गणेशोत्सवानिमित्त होणारी गर्दी लक्षात घेऊन मुंबई आणि कुडाळ दरम्यान वातानुकूलित विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक ०१२६९ वातानुकूलित गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ७ ते १० सप्टेंबर रोज ०४.३५ वाजता सुटेल आणि कुडाळला त्याच दिवशी दुपारी १४.३० वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक ०१२७० वातानुकूलित गाडी कुडाळ येथून या तारखांना दुपारी १५.३० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस इथं दुसऱ्या दिवशी पहाटे ३ वाजता पोहोचेल. या गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरावली रोड, संगमेश्वार रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली आणि सिंधुदुर्ग स्थानकात थांबा देण्यात आला आहे.

या गाडीचे आरक्षण ४ सप्टेंबरपासून उपलब्ध होईल. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असून, गणेश भक्तांनी गावी जाण्यासाठी रेल्वे स्थानकात गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे.

गणेशोत्सवानिमित्त अनेकजण आपल्या गावी म्हणजे कोकणात जाण्यासाठी तयारी करत आहे. मात्र या गणेश भक्तांना यंदाही कोरोनाचा सामना करावा लागत आहे. त्यानुसार, कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणीची अट कायम आहे. प्रवासाच्या ७२ तासांआधीचा 'आरटीपीसीआर' अहवाल किंवा २ लसमात्रा असल्या तरच कोकणात प्रवेश मिळेल, असं प्रशासनानं स्पष्ट करण्यात आलं आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या