मुंबई ट्रान्स हार्बर लिंक डिसेंबर २०२३ पर्यंत सुरू होऊ शकते

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचे काम ८४ टक्के पूर्ण झाले आहे. पुढील वर्षी डिसेंबरपूर्वी हा प्रकल्प पूर्ण होईल. त्यामाध्यमातून रायगड जिल्ह्यातील चिर्ले जवळील पेण, पोयनाड परिसरात ग्रोथ सेंटर निर्माण करण्यात येणार आहे.

लॉजिस्टिक्स पार्क, टाऊनशिप आणि रोजगार निर्मिती या तीन बाबींवर लक्ष केंद्रीत केले जाणार असून याद्वारे संबंधित परिसराचा सुनियोजितपणे विकास होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मुंबईला रायगड जिल्ह्याशी थेट जोडणारा हा २२ किमी लांबीचा देशातील सर्वाधिक मोठा पहिला सागरी सेतूमार्ग आहे. या सागरी सेतूवरून दिवसाला किमान एक लाख वाहनांची ये-जा करण्याची क्षमता असून नागरिकांच्या वेळेची तसेच इंधनाची मोठी बचत होईल. हा प्रकल्प प्रदूषण विरहीत असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक चिर्ले गावाजवळून मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाला जोडण्यात येणार आहे. त्याचबरोबर हा प्रकल्प ‘ईस्टर्न फ्री वे’ला जोडणार असल्याने मुंबईतून थेट रायगड असा प्रवास करणे शक्य होणार आहे. शिवाय मुंबई -वरळी कोस्टल रोडदेखील शिवडी वरळी कनेक्टरमार्गे जोडण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

याप्रकल्पाचे काम करताना ऑर्थोटॉपीक स्टील डेस्क (ओएसडी) या जपानी तंत्रज्ञानाचा प्रथमच वापर पहिल्यांदाच करण्यात आला आहे. त्याचे वजन काँक्रीटपेक्षा कमी असून वेगाने काम होण्यास मदत होत आहे.

पर्यावरणपूरक असा हा प्रकल्प असून त्याच्या माध्यमातून वर्षाला सुमारे २६ हजार टन कार्बनडायऑक्साईड कमी होणार आहे. ३ पॅकेजच्या माध्यमातून या प्रकल्पाचे काम सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


हेही वाचा

मुंबईतील 'हा' पूल जून २०२४ पर्यंत वाहतूकीसाठी राहणार बंद

पुढील बातमी
इतर बातम्या