मध्य रेल्वेवर १२ नवे पादचारी पूल

एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीनंतर नेमण्यात आलेल्या 'मल्टी डिसिप्लिनरी टीम'ची पहिली आढावा बैठक सोमवारी झाली. या बैठकीत मध्य रेल्वेवर १२ नव्या पादचारी पुलांबरोबरच ४ जुन्या पादचारी पुलांचं रूंदीकरण करण्याचं ठरलं आहे.

या बैठकीत रेल्वेच्या हद्दीबरोबरच महापालिकाही आपल्या हद्दीत १५० मीटरचे ‘नो फेरीवाला झोन’ जाहीर करणार असून फेरीवाल्यांवर दुप्पट दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांना अडचण होऊ नये, म्हणून रेल्वे स्थानकांची १५० मीटरची हद्द निश्चित करण्यासाठी तेथे सूचना फलक लावण्यात येणार आहे.

 

पादचारी पुलांसाठी रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव

पादचारी पुलांचं सर्वेक्षण केल्यानंतर १२ नव्या पादचारी पुलांची उभारणी करण्याचं निश्चित करण्यात आलं आहे. तसंच ४ जुन्या पादचारी पुलांचं रूंदीकरण करण्यात येणार असून त्यासाठी रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव पाठवण्यात आल्याचंही मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक एस.के.जैन यांनी स्पष्ट केलं आहे. रेल्वे स्थानकाबाहेरील महापालिकेच्या हद्दीत जेथे वाहनांचं बेकायदेशीर पार्किंग असेल तिथे महापालिकेने अशा वाहनांवर कारवाई करण्याचं ठरवलं आहे. रेल्वेच्या जागांचं सर्वेक्षण करून जिथे अशा जागा उपलब्ध आहेत, तेथे प्रवाशांसाठी स्वच्छतागृह उभारण्याची सूचना बैठकीत पुढे आली आहे.

'येथे' पादचारी पूल उभारणार

दादर, मुलुंड, अांबिवली, टिटवाळा, वासिंद, आटगांव, कसारा, उल्हासनगर, वडाळा रोड, टिळक नगर, कुर्ला, गोवंडी, विक्रोळी, विद्याविहार, करीरोड आणि चिंचपोकळी या स्टेशनवर पादचारी पूल उभारण्यात येणार आहेत.

२४ वॉर्ड अधिकाऱ्यांची यादी 

रेल्वेची कारवाई सुरू होताच स्थानकांबाहेरील फेरीवाले आपले बस्तान हलवतात. हे पाहून महापालिकेशी समन्वय साधण्यासाठी २४ वॉर्डच्या अधिकाऱ्यांना नियुक्त करण्यात आलं आहे. त्यांनी दाद दिली नाही, तर अतिरिक्त महापालिका आयुक्तांकडे दाद मागण्याची तरतूद करण्यात आली आहे. वॉर्ड ऑफीसरच्या मोबाईल क्रमांकाची यादीच रेल्वेला पुरविण्यात आली आहे.

शिवाय, लोकमान्य टिळक टर्मिनसला दररोज ३ लाख लिटर पाणी मिळते. पण, दररोजची गरज २५ लाख लीटरची असल्याने महापालिकेने २० लाख लीटर पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे.

पत्री पुलाजवळ ३० मीटरचा उड्डाणपूल

मध्य रेल्वेच्या कल्याण ते कर्जत, कसारा सेक्शनमध्ये रूळांच्या क्रॉसींगमध्ये बदल करण्यात येणार असून यार्ड रिमॉडेलिंगची कामे हाती घेतली आहेत. येथे पत्री पुलाजवळ कसारा दिशेला ३० मीटरच्या उड्डाणपुलाच्या बांधण्याचं नियोजन आहे. त्यामुळे लोकलसाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध होऊन लोकलची नेहमी होणारी लटकंती टळणार असल्याचं मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक एस. के. जैन यांनी सांगितलं.

एल्फिन्स्टन रोड दुर्घटनेनंतर नेमलेल्या मल्टी डिस्प्लिनरी कमिटीच्या पहिल्या समन्वय आढावा बैठकीत सोमवारी पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापक, मुंबई महापालिकेचे अधिकारी, मुंबई पोलीस आयुक्तालयाचे कर्मचारी उपस्थित होते.

पुढील बातमी
इतर बातम्या