नवी मुंबई विमानतळ नामकरण वाद: स्थानिकांचं सिडकोला घेराव आंदोलन

प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांचेच नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्याच्या मागणीसाठी दिबांच्या स्मृतीदिनी, गुरुवारी सिडको भवनाला घेराव घालण्याचा निर्धार भूमिपुत्रांनी केला आहे. जमावबंदी लागू असतानाही तसंच पुकारलेलं आंदोलन होवू नये, यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न करूनही भूमिपुत्रांचा एल्गार कायम असल्यामुळे या आंदोलनाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

नवी मुंबई विमानतळाच्या कामाला सुरुवात होण्यापूर्वीपासून म्हणजेच मागील १० वर्षांपासून स्थानिक प्रकल्पग्रस्त नागरिक, नेते विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी आग्रही आहेत. अनेक संस्था, संघटनांनी आणि राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबतच्या मागण्यांची निवेदने सिडको, राज्य सरकारकडे दिलेले आहेत.

काही महिन्यांपूर्वी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी पुढे आणली. सिडको संचालक मंडळाने बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा ठराव सरकारकडे पाठवल्यानंतर या नामांतराच्या वादाला तोंड फुटलं. सुरुवातीपासून सर्वपक्षीय नेत्यांची कृती समिती दिबांच्या नावाचा आग्रह धरत असताना राज्य सरकारमधील महाविकासआघाडीच्या नेत्यांनी बाळासाहेबांच्या नावाला पाठिंबा दिल्यानंतर 'दिबा विरुद्ध बाळासाहेब' असा वाद निर्माण झाला.

कृती समितीत दिबांचं नाव देण्यासाठी भाजपाचे पनवेल उरणचे दोन्ही आमदार सक्रिय असल्यामुळे आंदोलनाची धार वाढली आहे. १० जूनला पनवेल, नवी मुंबई, मुंबई, ठाण्यात मानवी साखळी आंदोलन यशस्वी केल्यानंतर सर्वपक्षीय कृती समितीने दिबांचे स्मृतीदिनाच्या दिवशी बेलापूर येथील सिडको भवनाला घेराव घालण्याचा निर्धार केला आहे.

१ लाख नागरिक आंदोलनात सहभागी होतील असा अंदाज वर्तवला जात आहे. गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कृती समितीने स्थानिकांना जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या