टोलनाक्यांवर १०० मीटरपेक्षा मोठी रांग असल्यास टोल माफ

टोल नाक्यांवर अनेक वेळ मोठी रांग लागलेली असते. अनेक वेळा काही किलोमीटरही रांग जाते. त्यामुळे वाहनचालकांचा मोठा वेळ वाया जातो. मात्र, आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या टोल नाक्यांवर होणाऱ्या कोंडीतून वाहनचालकांची सुटका होणार आहे. 

टोल नाक्यांवर १०० मीटरपेक्षा अधिक वाहनांच्या रांगा असतील तर टोल न आकारताच वाहनांना सोडलं जाणार आहे. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने देशभरातील टोल नाक्यांसाठी नवीन मागर्दशक तत्त्वे आखली आहेत. गर्दीच्या वेळी प्रत्येक वाहनाला १० सेकंदापेक्षा अधिक थांबावे लागू नये हे उद्दिष्ट ठेवून नवीन मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्यात आली आहेत. यानुसार, अवघ्या १० सेकंदात टोल नाक्यावरुन वाहनचालकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. 

टोल नाक्यांवर रांगेची लांबी १०० मीटरपर्यंतच राहील याची काळजी घेण्यात येणार आहे. यासाठी टोल प्लाझावर १०० मीटर लांब रांग ओळखण्यासाठी पिवळी पट्टी लावण्यात येणार आहे. जोपर्यंत वाहनांची रांग १०० मीटरपेक्षा कमी होत नाही, तोपर्यंत त्या चालकांकडून टोल घेतला जाणार नाही, असे मार्गदर्शक तत्त्वात नमूद केलं आहे.

राष्ट्रीय महामार्गांवरील टोल नाक्यांवर फास्टॅग अनिवार्य केल्यानंतर  प्रवाशांचा झटपट प्रवास होईल, अशी आशा प्राधिकरणाला होती. मात्र, काही टोल नाक्यांवर टोल घेताना तांत्रिक कारणास्तव बराच वेळ जातो. त्यामुळे चालकांना मोठा मनस्ताप होत असल्याच्या अनेक तक्रारी प्राधिकरणाकडे येत होत्या. या पार्श्वभूमीवर नवीन मागदर्शक तत्त्वे लागू करण्यात आली आहेत.  



हेही वाचा - 

गुड न्यूज! १ जूननंतर लाॅकडाऊनच्या निर्बंधात शिथिलता येणार

  1. आरोग्य सेतूवर आले 'हे' नवीन फिचर, 'असे' ठरेल फायदेशीर
पुढील बातमी
इतर बातम्या