मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव घटला असला तरी दिल्लीत कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली आहे. दुसरी लाट धडकल्यानं दिल्लीतील स्थिती दिवसेंदिवस अधिकच नाजूक होत चालली आहे. ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकार सतर्कता बाळगत दिल्लीशी तूर्त संपर्क तोडण्याच्या दृष्टीनं महत्त्वाच पाऊल उचललं जाण्याची शक्यता आहे. शिवाय रेल्वे प्रशासन मुंबई ते दिल्ली रेल्वे सेवा थांबविण्याची चर्चा सर्वत्र सुरू होती. परंतु, रेल्वेनं मुंबई ते दिल्ली रेल्वे सेवा बंद करणार नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून दिल्ली-मुंबई विमानसेवा तसंच रेल्वेसेवा बंद ठेवता येईल का, याबाबत राज्य सरकार विचार करत आहे. दिवाळीनंतर दुसऱ्या लाटेचीही शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाची दुसरी संभाव्य लाट रोखण्यासाठी वेळीच पावले उचलली जात आहेत.
राज्य सरकारसोबतच रेल्वे, नागरी उड्डाण विभाग यांचीही परवानगी आवश्यक असल्याने संबंधितांशी चर्चा झाल्यानंतरच अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती मिळते.