फर्स्ट क्लासच्या डब्यात पोलिसांना का ‘नो एण्ट्री’?

  • मुंबई लाइव्ह टीम & सूरज सावंत
  • परिवहन

अपंगांसह प्रथम श्रेणी रेल्वेच्या डब्यात पोलिसांना विना तिकिट प्रवास करण्यावर बंदी असताना अनेक पोलिस सर्रास प्रवास करत असतात. काही दिवसांपूर्वी पोलिस आणि रेल्वेच्या टीसीमध्ये याच कारणांवरून झालेल्या वादानंतर हे प्रकरण उजेडात आलं. त्यामुळे पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकरांनी पास किंवा तिकिटाशिवाय पोलिस कर्मचारी रेल्वेच्या प्रथम श्रेणी डब्यातून प्रवास करू शकत नसल्याचे आदेश काढले आहेत.

म्हणून घातली बंदी

लोकल ट्रेनमधून रोज लाखो प्रवासी प्रवास करतात. या लोकल ट्रेनमध्ये प्रथम श्रेणीसह महिलांसाठी आणि अपंगांसाठीही राखीव डबा असतो. मात्र तरीही गर्दीच्या वेळी पोलिस कर्मचारी अंपगांच्या डब्यातून प्रवास करतात. ही बाब लक्षात आल्यानंतर अंपगांच्या डब्यातून पोलिसांना प्रवास करण्यावर बंदी घालण्यात आली.

ड्युटीवर नसतानाही...

अनेकदा पोलिस ड्युटीवर नसतानाही विना तिकीट प्रवास करतात. कालांतराने अंपगांचे डब्बे वगळून पोलिसांनी प्रथम श्रेणी डब्यातून विना तिकीट प्रवास सुरू केला. पोलिस असल्याचं सांगितल्यावर रेल्वेच्या तिकीट तपासकाकडून सोडले जात होते. यावरून काही दिवसांपूर्वी दादरमध्ये पोलिस शिपाई आणि रेल्वेचे तिकिट तपासणीस एकमेकांना भिडले. प्रकरण इतके चिघळलं की पोलिस आयुक्तांना यात लक्ष घालावं लागलं. याप्रकरणानंतर पोलिस आयुक्तांनी रेल्वेच्या अंपग आणि प्रथम श्रेणी डब्यातून पास अथवा विना तिकीट प्रवास करण्यावर बंदी घालण्याचे आदेश काढले.

नाहीतर दंडात्मक कारवाई 

इतकंच नव्हे, तर आयुक्तांनी यापुढे प्रथम श्रेणी रेल्वेच्या डब्यातून विना तिकीट प्रवास करणाऱ्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या असून या सूचना सर्व पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना वाचून त्याचे काटेकोरपणे पालक करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे यापुढे फस्ट क्लासच्या डब्यात विना तिकीट पोलिसांना 'एण्ट्री’ नसणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या