फर्स्ट क्लासच्या प्रवाशांनाही AC लोकलने प्रवास करता येणार, फक्त...

(File Image)
(File Image)

मध्य रेल्वे मार्गावरील लोकलने प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. ज्यांनी फर्स्ट क्लासचा पास काढला आहे, अशा प्रवाशांना आता एसी लोकलनेही (AC Local) प्रवास करता येऊ शकणार आहे.

आपला फर्स्ट क्लासचा पास (First class pass) या प्रवाशांना अपग्रेड करावा लागणार आहे. हा पास अपग्रेड करताना प्रवाशांना फर्स्ट क्लासचा पास आणि एसी लोकलचा पास यातील दरात असलेली रक्कम भरावी लागेल आणि त्यानंतर त्याचा पास अपग्रेड करुन दिला जाईल. यानंतर प्रवाशांना एसी लोकलनेही प्रवास करता येणं शक्य होणार आहे.

२४ सप्टेंबरपासून मध्य रेल्वे लोकल मार्गावर या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येते आहे. पण सध्या मध्य रेल्वे मार्गावर ऐन गर्दीच्या वेळी सोडण्यात येणाऱ्या एसी लोकलमुळे अनेक प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली होती.

गेले अनेक दिवस एसी लोकलने प्रवास करायची मुभा मिळावी, अशी मागणीही फर्स्ट क्लास पास धारकांच्या वतीने केली जात होती. मध्य रेल्वेनं घेतलेल्या निर्णयामुळे एसी लोकलच्या प्रवाशांची संख्याही वाढेल. शिवाय गर्दीच्या वेळी प्रवाशांना होणारा मनस्तापही कमी होईल, असा विश्वास व्यक्त केला जातोय.

महिन्याभरापूर्वी मध्य रेल्वे मार्गावर एसी लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली होती. त्यानंतर ऐन गर्दीच्या वेळी येणाऱ्या एसी लोकलमुळे प्रवाशांचा खोळंबा होत होता. यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली होती.

याच वर्षाच्या सुरुवातीला एसी लोकलचे तिकीटदर हे 50 टक्क्यांनी कमी करण्यात आले होते. पण एसी लोकलच्या पासचे दर हे इतर पासच्या तुलनेत महागच असल्यानं एसी लोकलचा प्रवास परवडणारा नाही, असा सूर उमटत होता. त्यामुळे अनेकांनी नियमित पास काढणंच पसंत केलं होतं.


हेही वाचा

नवरात्रीनिमित्त मुंबईकरांसाठी ‘बेस्ट’ ऑफर, 19 रुपयांत करा 10 वेळा प्रवास

पुढील बातमी
इतर बातम्या