आणखी एका बेस्ट कर्मचाऱ्याचा कोरोनानं मृत्यू

लॉकडाऊनच्या काळाच अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वाहतूक सेवा पुरविणाऱ्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांवर कोरोनाचं संकट आलं आहे. अनेक कामगार कोरोनाग्रस्त असून काहींचा मृत्यू झाला आहे. रविवारी बेस्ट उपक्रमातील आणखी एका कर्मचाचा मृत्यू झाला. त्याचवेळी एका कामगाराने कोरोनावर यशस्वी मात केली.

बेस्टच्या एका कामगाराला रविवारी कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळं बेस्टमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ३६वर पोहोचली आहे. त्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३०पर्यंत आहे. बेस्टच्या बॅकबे आगारातील परिवहन अभियांत्रिकी विभागात मुकादम असलेल्या कर्मचाऱ्यास कोरोनाची लागण झाली होती. या कामगारावर २२ एप्रिलपासून रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याचे रविवारी उपचारादरम्यान निधन झाल्याचे बेस्टतर्फे सांगण्यात आलं. त्याचवेळी रविवारी आणखी एका कामगारास कोरोनाची लागण झाल्याचं उपक्रमानं स्पष्ट केलं आहे.

अत्यावश्यक सेवेसाठी वाहतुकीची जबाबदारी बेस्ट उपक्रमावर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे सुरुवातीपासून या कामगारांना आवश्यक सुविधा पुरविण्याची मागणी केली जात आहे. बेस्ट कामगारांमध्ये कोरोनाची लागण होत असतानाच त्यावर यशस्वी मात करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. परळमधील कामगार वसाहतीत राहणाऱ्या कामगारास २७ एप्रिलपासून कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यास विलगीकरण प्रक्रियेत ठेवण्यात आलं. त्यानं कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.

बेस्ट उपक्रमातील रविवारी निधन झालेल्या कर्मचाऱ्याच्या वारसास तातडीनं बेस्टमध्ये सेवेत घ्या. तसंच बेस्टनं सरकारी विमा योजनांचा आधार घेतानाच त्यांच्या निधीतून १ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य कामगारांच्या कुटुंबास देण्याची मागणी बेस्ट वर्कर्स युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी महाव्यवस्थापकांकडे केली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या