पहिल्याच दिवशी मेट्रोला प्रवाशांचा कमी प्रतिसाद

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली मुंबई मेट्रो (mumbai metro) सोमवारी म्हणजे जवळपास ७ महिन्यांनंतर प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. घाटकोपर-वर्सोवा मेट्रो सेवा सोमवारपासून सुरू झाली असली, तरी पहिल्याच दिवशी मेट्रोला कमी प्रतिसाद मिळाला असून, दिवसभरात १०,१९७ प्रवाशांनी (passenger) प्रवास केल्याची माहिती समोर येत आहे.

घाटकोपर-वर्सोवा मेट्रो सेवा १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली. परंतू, सर्व सुरक्षा चाचण्या आणि आरोग्य सुरक्षेच्या विविध उपाययोजना करीत मेट्रो सुविधा सोमवारपासून सर्व मुंबईकरांसाठी कार्यरत झाली.

मेट्रोला प्रवाशांचा कमी प्रतिसाद असून, स्थानकात तिकीट खिडक्या आणि सुरक्षा चौकटींवर दिसणाऱ्या लांबच लांब रांगा या वेळी कोठेच दिसल्या नाहीत. उलट मर्यादित प्रवेशद्वारांचा वापर आणि प्रवाशांसाठी आखून दिलेली बंदिस्त मार्गिका यांमुळे स्थानकात इतरत्र फिरणारे प्रवासीही दिसत नव्हते.

नव्या नियमांनुसार मेट्रो रेल्वे गाडीतून १०० प्रवासी बसून आणि २६० प्रवासी उभे राहून प्रवास करू शकतात. पण पहिल्या दिवशी सर्व उपलब्ध आसनेदेखील संपूर्णपणे व्यापलेली दिसली नाहीत. प्रस्तुत प्रतिनिधीने या मार्गिकेवर २ फेऱ्या प्रवास केला असता, सुमारे ५० प्रवासी एका वेळी प्रवास करताना आढळले.

मेट्रो-१ ही अंधेरी आणि घाटकोपर या २ महत्त्वाच्या उपनगरी रेल्वे स्थानकांना जोडलेली असल्याने या मार्गिकेवर कायमच गर्दी असते. पण सध्या उपनगरी रेल्वेचा वापर सर्व प्रवाशांना करता येत नसल्यामुळेही मेट्रो मार्गिकेच्या प्रवासी संख्येवर सोमवारी परिणाम झाल्याचे दिसून आले.

तापमान आणि मुखपट्टी तपासूनच प्रवेश दिला जात होता. तिकिटासाठी क्यूआर कोडचा पर्याय असला तरी तो न वापरणाऱ्यांना तिकीट खिडकीवर कागदी तिकीट दिले जात होते. तसेच क्यूआर कोडचा वापर करणाऱ्यांची संख्या पहिल्या दिवशी तुरळक असल्याचे दिसले. सध्या या मार्गिकेवर साडेसहा ते आठ मिनिटांच्या वारंवारितेनुसार दिवसाला २०० फेऱ्या होतील.

२२ मार्चपासून मेट्रो सुविधा बंद असल्याने दरम्यानच्या काळात पास तसेच स्मार्टकार्डवरील शिल्लक रकमेची मुदत वाढवून देण्याची सुविधा देण्यात आली आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत अंधेरी स्थानकात या खिडकीवर सुमारे १०० हून अधिक प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घेतल्याचे समजतं.

पहिल्या दिवशी १८३ फेऱ्या पूर्ण

  • पहिल्या दिवशी संध्याकाळी ७ वाजेपर्यंत मेट्रोच्या एकूण १८३ फेऱ्या पूर्ण झाल्या.
  • यामध्ये एकूण १० हजार १९७ प्रवाशांनी प्रवास केला.
  • कोरोनापूर्व काळात एका दिवसात सुमारे ३५० ते ४०० फे ऱ्यांमध्ये चार ते साडेचार लाख प्रवासी मेट्रोवर प्रवास करत.
  • मेट्रो सुविधा सकाळी ८.३० ते रात्री ८.३० दरम्यान सुरू असेल.
पुढील बातमी
इतर बातम्या