एसटी महामंडळाकडून कर्मचाऱ्यांवर बडतर्फीच्या कारवाईला सुरूवात

विलीनीकरणाच्या मागणीसाठी संपावर गेलेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. संपावर गेलेल्या आणि निलंबनानंतरही एसटी महामंडळाला प्रतिसाद न देणाऱ्या कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. त्यानुसार, २३० एसटी कर्मचाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस पाठवण्यात आली असून ७ दिवसांत उत्तर न दिल्यास थेट बडतर्फ करण्याचा इशारा एसटी महामंडळानं दिला आहे.

मंगळवारी ३८ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. त्यामुळं एसटीच्या एकूण निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या १०,३०० झाली आहे. १३ डिसेंबरपर्यंत एसटीचे निलंबित कर्मचारी पुन्हा कामावर रुजू झाल्यास निलंबन रद्द करण्यात येईल, असे आश्वासन परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळ अध्यक्ष अनिल परब यांनी दिले होते. परंतु या आश्वासनालाही प्रतिसाद न देता कर्मचारी संपावर ठाम राहिले.

यामुळं आता एसटी महामंडळानं निलंबनानंतरच्या पुढील कारवाईला सुरुवात केली आहे. निलंबनाची नोटीस दिल्यानंतर १५ दिवसांत आपलं म्हणणं मांडण्याची संधी कर्मचाऱ्यांना दिली आहे. त्यानंतरही ३ वेळा सुनावणीसाठी बोलावण्यात आले. परंतु त्यालाही योग्य प्रतिसाद न देणाऱ्या अखेर २३० कर्मचाऱ्यांना बडतर्फीची 'कारणे दाखवा' नोटीस पाठवण्यात आली आहे.

नोटीस पाठवल्यानंतर ७ दिवसांत त्यांनी उत्तर देणं अपेक्षित आहे. त्यालाही प्रतिसाद न मिळाल्यास कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात येणार आहे. दरम्यान, एसटीतील रोजंदारीवरील कर्मचारीही संपात सहभागी असून त्यांच्यावर सेवासमाप्तीची कारवाई केली जात आहे.

एसटीत २,६३२ रोजंदारीवरील कर्मचारी असून यात चालक, चालक तथा वाहक, वाहक, साहाय्यक, लिपिक व टंकलेख यांचा समावेश आहे. मंगळवारी दोन कर्मचाऱ्यांची सेवासमाप्ती करण्यात आली. त्यामुळे सेवासमाप्ती केलेल्या रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांची संख्या २,०३९ झाली आहे. 

याशिवाय एसटी कर्मचाऱ्यांच्या बदल्याही केल्या जात असून मंगळवारी ९१ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. बदली केलेल्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्याही २,५७२ झाली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या