'तेजस' ट्रॅकवर धावण्यासाठी सज्ज! सुरेश प्रभूंच्या हस्ते झालं उद्घाटन

कोकण आणि गोवावासियांसाठी पर्वणी ठरणाऱ्या 'तेजस एक्स्प्रेस'ला रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सोमवारी हिरवा कंदील दाखवला आणि तेजस ट्रॅकवर धावण्यासाठी सज्ज झाली. सोमवारी प्रभूंच्या हस्ते 'तेजस एक्सप्रेस'चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी कोकणातील 28 स्टेशनवर रविवारी वायफाय चालू केल्याचीही माहिती दिली. तसेच रेल्वेमध्ये जे खानपान प्रवाशांना दिले जाते त्यासाठी नवीन कॅटरिंग पॉलिसीही जाहीर करणार असल्याचं सांगत त्यांनी कॅटरिंग स्टॉल स्थानिकांनाच देतोय अशीही माहिती दिली. प्रवाशांना स्थानिक खानपान मिळावं यासाठी आयआरसीटीसीच्या वेबसाईटचे नूतनीकरण केले जाणार अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. सर्वसामान्य मध्यमवर्गीयांसाठी एक्स्प्रेस सुरु केल्या आहेत, आता जिवाचं गोवा करू इच्छिणाऱ्यांसाठी तेजस एक्स्प्रेस आणल्याचं सांगत त्यांनी प्रवाशांना शुभेच्छा दिल्या.

ही एक्स्प्रेस रात्री 12.35 वाजता करमाळीमध्ये पोहोचणार आहे. 10 जून ते 31 ऑक्टोबर दरम्यान ही गाडी आठवड्यातून तीन वेळा आणि त्यानंतर आठवड्यातून पाचवेळा धावणार असल्याचं रेल्वे मंत्रालयाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.


तेजसची वैशिष्ट्ये:
• वायफाय सुविधा
• शुद्ध पाण्याची सोय
• उत्कृष्ट सीट
• उर्जा कार्यक्षम एलईडी लाईट्स
• डिजिटल माहिती बोर्ड
• इलेक्ट्रॉनिक वायफाय प्रणालीने बनलेले ब्रेक
• उत्कृष्ट शौचालय
• अग्निशमन प्रणाली
• सीसीटीव्ही कॅमेरा
• आपत्कालीन द्वार
• आपत्कालीन इलेक्ट्रॉनिक सूचना यंत्रणा

पुढील बातमी
इतर बातम्या